मुंबई : कोकणात स्वयंपाकात आर्वजून वापरला जाणार पदार्थ म्हणजे कोकम! रातांबे सुकवून कोकम बनवले जाते. चवीला आंबट असलेले कोकम पित्तशामक आहे. कोकमाच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि अॅसिडीटी यांसारख्य़ा समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच कोकमामुळे अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात तर आहारात कोकमाचा अवश्य समावेश करा. त्यासाठी काही खास पर्याय...
भूक वाढवण्यास कोकम करी फायदेशीर ठरते. कोकम करी बनवण्यासाठी कोकम पाण्यात भिजत घाला आणि त्याचा रस काढा. चवीनुसार त्यात मीठ आणि साखर घाला. हिंग, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घाला. एकत्र मिक्स करा आणि प्या.
उन्हाळ्यात कोकम सरबत पिणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात होणारे डिहाड्रेशनचा त्रासापासून सुटका करण्यासाठी कोल्ड ड्रिंकऐवजी कोकम सरबत घ्या. मीठ, जिरेपूड, धनापूड घालून कोकम सरबत घेणे उपयुक्त ठरेल.
५-६ कोकम पाण्यात भिजत घालून त्यात मीठ, गुळ, हिरव्या मिरच्या आणि जिरे घालून वाटा. खाण्यासाठी चटणी तयार.
दररोज आहारात कोकमाचा समावेश करण्याचा हा सोपा उपाय आहे. फिश करी, भेडींची भाजी, सांबार, आमटी बनवताना त्यात कोकम घाला.
सोलकढी प्यायल्याने भूक वाढते. पचन चांगले होते. कोकम पाण्यात मिसळून त्याचा घट्ट रस काढावा. नारळाच्या दूधामध्ये कोकमाचा कोळ मिसळून त्यावर हिंग़, मोहरी, जिरं, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्यावी. तयार मिश्रण नीट एकत्र करून काहीवेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे.