मुंबई : बटाटा. बऱ्याच भाज्यांना चव देणारा, बरेच चवीष्ट पदार्थ बनवण्यासाठी प्रेरणा देणारा आणि जीभेचे चोचले पुरवणारा बटाटा. पण, हाच बटाटा आपल्यापासून दुरावतो, जेव्हा आपण सुदृढ शरीर मिळवण्याच्या नादात आहाराच्या सवयी बदलतो. बटाट्यामुळं स्थूल व्हायला होतं, असाच अनेकांचा समज. पण, खरंच असं होतं का? विचार केलाय कधी?
बटाटा योग्य पद्धतीनं आहारात समाविष्ट केल्यास कोणीही व्यक्ती स्थूल होत नाही. किंबहुना तो आरोग्याच्या दृष्टीनं हितकारकच ठरतो. तुम्हाला फक्त बटाटा खाण्याच्या काही सवयी बदलायच्या आहेत. (potato eating habits for weight loss)
जाणकारांच्या मते एका वेळी 170 ग्रॅमहून जास्त बटाटा खाऊ नये. असं केल्यास बरीच पोषक तत्त्वं आणि कमीत कमी फॅट्स तुमच्या शरीरात जातात. 4 ग्राम प्रोटीन तुम्ही 170 ग्रॅम बटाट्यामधून मिळवू शकता.
बटाटा एखाद्या भाजीमध्ये टाकून त्यासोबत तो शिजवून खाण्याऐवजी, उकडून किंवा बेक करुन त्याचं सेवन करावं. तुम्ही बटाटा भाजूनही खाऊ शकता. बटाट्यामध्ये विटामिन सी, विटामिन बी 6, मँगनीज आणि फॉस्फरस अशी पोषक त्तत्वं तुम्ही मिळवू शकता.
बटाटा खाण्याची सर्वात उत्तम पद्धत माहितीये ?
बटाटा असा नाही खायचा, तसा नाही खायचा मग तो खायचा तरी कसा? तुम्हालाही पडला ना हा प्रश्न? तर, बटाटा दह्यात मिसळून, शिजवून खा. त्यामध्ये काळीमिरी पूड आणि सैंधव मीठ मिसळा. बटाटा खाण्याची ही सर्वात आरोग्यवर्धक पद्धत आहे.
बटाट्याच्या साली फेकताय ?
सहसा बटाटा खाताना त्याची साल काढूनच तो शिजवला जातो. पण, बटाटा सालीसकट खाणं कधीही फायद्याचं. काही भाज्यांच्या सालीसुद्धा फायदेशीर ठरतात. बटाटा त्यापैकीच एक.