Story Of Shrikhanda: गुढीपाडव्याला किंवा दसऱ्याला महाराष्ट्रीय घरात आवर्जुन श्रीखंड आणलं जातं. श्रीखंड पुरी हे प्रत्येक घरात सणासुदीला केले जाते. पण तुम्हाला माहितीये का श्रीखंडाचा शोध पहिल्यांदा कोणी व कसा लावला? खरं तर भारतीय खाद्यपदार्थांचा एक वेगळा इतिहास आहे. तसाच श्रीखंडालाही मोठा इतिहास आहे. श्रीखंडाचा शोध हा महाभारताच्या काळात लागला आहे.
श्रीखंडाचा उगम कसा झाला याबाबत अनेक मतं आहेत. काही इतिहासकारांच्या मते, दही सर्वप्रथम महाभारतात भीमानं विराट राजाकडं बनवलं होतं. पांडव अज्ञातवासात असताना भीम बल्लव म्हणून विराट राजाकडे स्वयंपाकी म्हणून काम करत असताना हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम केला गेला. म्हणजेच श्रीखंडाचा उगम जवळपास 4 ते 5 हजार वर्षांपूर्वीचा आहे.
महाभारतातील काळात पाणी काढून टाकलेल्या दह्यात फळं घालून तो पदार्थ केला होता आणि त्याला शिखरिणी हे नाव दिलं होतं. त्याकाळी दही फडक्यात घालून, पिळून त्यातील पाणी काढून टाकावं आणि त्यात साखर व वेलची पूड घालावी असं म्हटलं जातं. महाभारतातील काळात श्रीखंडात फळं देखील टाकली जायची.
सर्वप्रथम श्रीखंड बनवल्या गेल्यानंतर ते भगवान श्रीकृष्णाला देण्यात आले. पण श्रीखंडाच्या सेवनामुळं श्रीकृष्णाला झोप आली तसंच, श्रीच्या दैनंदिन व्यवहारात खंड पडला. म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.
दही फडाक्यात घालून टांगून ठेवतात म्हणजेच चक्का तयार होतो. मग त्यात साखर घालून फेटून घेतात. मग त्यात केशर, वेलची, बदाम पिस्ताचे काप असे घालून श्रीखंड तयार केले जाते. हल्ली श्रीखंडामध्ये वेगवेगळे फ्लेवर्सदेखील अॅड केले जाते हल्ली आंबा, स्ट्रॉबेरी, सुका मेवा, गुलकंद या वस्तू घालूनही श्रीखंड तयार केले जाते.
दही हे प्रोबायोटिक आहे. त्यामुळं पचनाला मदत होते. आरोग्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात दही खाणं योग्य असते तसंच, गुढी पाडव्याच्या दिवशी व दसऱ्याच्या दिवशी वातावरणात उष्णता असते त्यामुळं या दिवशी श्रीखंड बनवण्याची पद्धत रुजू झाली असावी. पण श्रीखंड हे प्रमाणातच खायला हवे.