Health News : धकाधकीच्या जीवशैलीशी (Lifestyle) जुळवून घेण्याच्या नादात भारतातील एका पिढीनं त्यांच्या आरोग्याकडे पुरतं दुर्लक्ष केलं आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या जगाचा वेग धारण करून त्याच वेगाला अनुसरून आयुष्य जणारे अनेकजण दर दिवशी पाहायला मिळतात. पण, त्यांची हीच सवय कळत- नकळत आरोग्यावरही थेट परिणाम करताना दिसत आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि वेळांपासून अगदी नोकरीच्या ठिकाणी बसण्याच्या पद्धतीपर्यंतची प्रत्येत लहानमोठी गोष्ट थेट आरोग्यावर आणि हृदयावरही परिणाम करताना दिसत आहे. आता हृदयावर हा परिणाम नेमका कसा होतोय? याचीच माहिती इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
भारतातील उत्तर पश्चिमी राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सध्या हायपरकोलेस्ट्रोलेमियाचा धोका वाढत असून, ही एक अशी स्थिती आहे जिथं रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) अर्थात एलडीएलचं प्रमाण वाञून 'गुड' कोलेस्ट्रॉल (एचडीएल)चं प्रमाण कमी होतं.
इंडियन कार्डियोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आलेल्या या निरीक्षणानुसार विविध भौगोलिक क्षेत्रांमधील व्यक्तींच्या मदतीनं ही माहिती मिळवण्यात आली. या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशाचील पूर्वीय राज्यांमध्ये 18.8 टक्के, पश्चिमेला असणाऱ्या राज्यांमध्ये 29.2 टक्के, उत्तरेकडील राज्यांमध्ये 28.2 टक्के आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये 24.5 टक्के नागरिकांमध्ये हायपरकोलेस्ट्रॉलेमियाची समस्या आढळली.
हृदयरोग, पक्षाघात आणि इतर अनेक गंभीर आजाराची सुरुवात किंवा मूळ कारण म्हणजे हायपरकोलेस्ट्रॉल. किंवा हायपरकोलेस्ट्रॉलेमिया ही स्थिती. धमन्यांमध्ये प्लाक जमा करून त्यातून सुरू असणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये अडचणी निर्माण करण्याचं घातक काम हायपरकोलेस्ट्रॉल करतं. त्यामुळं वेळीच या स्थितीचं निदान होणंही तितकंच महत्त्वाचं.
केरळातील नागरिक हाय कोलेस्ट्रॉलचे शिकार
समोर आलेल्या निरीक्षणानुसार हाय कोलेस्ट्रॉल आकडेवारीच्या बाबतीत केरळ आघाडीवर असून, इथं जवळपास 50.3 टक्के नागरिकांच्या कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्यहून अधिक आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, त्यामागोमाग गोवा (45.6%) आणि हिमाचल प्रदेश (39.6%) या राज्यांची नावं येतात.
उत्तर भारताकडील राज्यांमध्ये देशातील असे सर्वाधिक नागरिक आहेत ज्यांच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची टक्केवारी जास्त असून, ही चिंतेची बाब आहे. उत्तर भारतात फक्त 29.1 टक्के नागरिक असे आहेत ज्यांच्या शरीरात गुड कोलेस्ट्रॉल असून, उरलेला आकडा हा बॅड कोलेस्ट्रॉल असणाऱ्या नागरिकांचा आहे. त्यामागोमाग पश्चिम भारत (30.2%), दक्षिण भारत (23.5%), पूर्व भारत (19.2%) अशी क्रमवारी समोर येते.