Menstruation Cycle and Signs on Body : मासिक पाळी येण्याच्या आधी शरिर देते 'हे' संकेत

पाळी येण्याआधी शरीरामध्ये हॉर्मोनल बदल घडतात ज्याचे संकेत शरीर देत असतं. हॉर्मोन्सच्या पातळीत चढ उतार होत असल्यामुळे शरीर हे  असतं. मात्र हे संकेत व्यक्ती आणि काळपरत्वे या बदलत देखील असतात

Updated: Oct 31, 2022, 07:56 PM IST
Menstruation Cycle and Signs on Body : मासिक पाळी येण्याच्या आधी शरिर देते 'हे' संकेत title=

गायत्री पिसेकर - काही तरी छानसा प्लान आखलेला असतो पण अचानक मासिक पाळी येते आणि हिरमोड होतो. प्रत्येक महिलेला हा अनुभव आलाच असेल. पाळी कधी सुरु होईल हे सांगणं तसं कठीणच. मात्र पाळी येण्याआधी शरीर काही संकेत देत असतं. हे संकेत नेमके कोणते? हे जाणून घेतले तर पाळी येण्याविषयीचा अंदाज बांधता येऊ शकतो. पाळी येण्याच्या आठवडाभर आधी शरीर तुम्हाला जे संकेत देते त्यास पीएमएस (Premenstrual syndrome) म्हटलं जातं. आजकाल मुलींमध्ये पीएमएस हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जातो. पाळी येण्याआधी शरीरामध्ये हॉर्मोनल बदल घडतात ज्याचे संकेत शरीर देत असतं. हॉर्मोन्सच्या पातळीत चढ उतार होत असल्यामुळे हे संकेत मिळतात. पाळी येण्याआधीचे संकेत एकसारखेच असतात असं नाही. तसेच दर महिन्याला त्याच प्रकारचे संकेत मिळतात असं नाही. व्यक्ती आणि काळपरत्वे या संकेतामध्ये बदल होत असतात.

पीएमएस (Premenstrual syndrome) म्हणजे काय?

पीएमएस पाळीच्या आधी जाणवणारी शारिरीक आणि भावनिक लक्षणं. साधारणत: पाळी येण्याच्या आठवडाभरआधी आणि पाळी आल्यापासूनचे 4 दिवस अशा प्रकारची लक्षणं जाणवू शकतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरके मासिक पाळी नियंत्रित करतात. मासिक पाळीच्या काळात या संप्रेरकांमध्ये चढ-उतार होत असतात. ओव्हुलेशन (ovulation) च्या आधी इस्ट्रोजेन संप्रेरके प्रभावी असतात तर (ovulation) नंतर प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचा प्रभाव वाढतो. पाळीयेण्याच्या एक दिवस आधीपर्यंत प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचा प्रभाव असतो. या दोन्ही संप्रेरकांच्या बदलामुळे पीएमएस लक्षणे वेगवेगळी असू शकतात. ओव्हुलेशन ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंडाशयातून परिपक्व अंडी बाहेर पडतात. 

ही लक्षणं कोणती आहेत ते जाणून घेऊयात?

1. मुरुमे (Skin Break Outs)

चेहऱ्यावर मुरुमे कोणालाच नको असतात. मात्र पाळीयेण्याआधी चेहऱ्यावर मुरुमे आल्याचा अनुभव प्रत्येक स्त्रिला येतोच. प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचा प्रभाव वाढल्यामुळे त्वचा नाजूक होते. त्वचा तेलकट होते म्हणजेच त्वचेवर सीबम (sebum) स्रवल्यामुळे मुरुमांचं प्रमाण वाढू शकतं.

2. स्तन (Tender Breast)

स्तनांना सूज येणे किंवा त्यांची संवेदनशीलता वाढणे. हे लक्षण ही अनेक स्त्रियांना जाणवू शकते. इस्ट्रोजेनमुळे स्तनाच्या नलिकांना सूज येते आणि प्रोजेस्टेरॉनमुळे दुधाच्या ग्रंथी फुगतात. त्यामुळे स्तनांची संवेदनशीलता वाढते. 

3. ओटीपोटातील दुखणं आणि कंबरदुखी (menstrual cramps)

पाळी येण्याच्या लक्षणापैंकी हे सर्वसाधारण लक्षण आहे. प्रोस्टॅग्लॅंडिन्स नावाचा स्रावामुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात ज्यामुळे गर्भाशयाच्या आतील अस्तराची गळती होते. (shedding of the uterus lining) ज्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी आणि ओटीपोटातील दुखणं वाढतं. मात्र, हे दुखणं जर सहन करण्यापलिकडचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

4. मूडस्विंग्स (mood swings)

चिडचीड होणे, अस्वस्थ वाटणे, निराश वाटणे, कोणतीही भावना नेहमीपेक्षा अधिक तीव्र होणे हा बदल जर तुम्हाला जाणवला तर तुम्हाला लवकरच पाळी येणार आहे असं समजावं. 

5. पोट फुगणे (Bloting) 

शरीरात वाढलेल्या प्रोजेस्टेरॉनच्या उच्च पातळीमुळे पचनक्रिया मंद होऊ शकते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटात गोळा येणे, पोट फुगणे ही लक्षणं जाणवू शकतात.

6. तीव्र थकवा (super tired)

शक्तीचा अभाव आणि प्रचंड थकवा जाणवणं हे सुद्धा एक पाळी येण्याआधीचं लक्षण आहे. सेरोटोनिन जे एक मेंदू आणि शरीरामध्ये समन्वय साधणारे रसायन आहे जे मूड आणि झोपेवर परिणाम करते. इस्ट्रोजेन पातळीत घट झाल्यामुळे सेरोटोनिनच्या पातळीत बदल होतो, परिणामी थकवा जाणवतो.

तुम्हालाही अशा प्रकारची किंवा यापेक्षा वेगळी काही लक्षणं आढळतात का? आढळत असल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.