मोठी बातमी । भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह

ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाचे स्ट्रेन ( new coronavirus) आता भारतात दाखल झाला आहे. (6 found positive with new, more infectious COVID-19 strain in India)  

Updated: Dec 29, 2020, 11:02 AM IST
मोठी बातमी । भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह  title=

मुंबई : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाचे स्ट्रेन ( new coronavirus) आता भारतात दाखल झाला आहे. (6 found positive with new, more infectious COVID-19 strain in India) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनाने डोकेदुखी वाढवली आहे. आता भारतातही नवा स्ट्रेन दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ब्रिटनमधून परतलेल्या सहा जणांना संसर्ग (6 UK returnees found positive) झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

 ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहे. असे असतानाही नव्या कोरोनाने भारतात शिरकाव केला आहे. यात बंगळुरुतील तीन , हैदराबादमधील दोन आणि पुण्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन आणि चाचणी करण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. 

कोरोनाचा नवीन स्ट्रेन जगातील सोळा देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात कोरोना व्हायरसचं संकट कमी होत असतानाच कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊन नवीन स्ट्रेनचा प्रसार होऊ लागला आहे. ब्रिटनमध्ये या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले. या प्रकारचा व्हायरसचा प्रसार वेगानं होत असल्याची माहिती समोर आली. यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ होते तोच कोरोनाचा आणखी दुसरा प्रकारही ब्रिटनमध्ये आढळून आला. 

अखेर त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तोपर्यंत नव्या स्ट्रेनचा हा व्हायरस जगातील सोळा देशांमध्ये पोहोचला आहे. ब्रिटनसह स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलंड, डेन्मार्क, नेदरलँड्स, जर्मनी या देशात पोहोचलाय. नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळून आला होता. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी डिसेंबरमध्ये ब्रिटनध्ये लॉकडाऊन घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर ब्रिटनहून विविध देशांत गेलेल्या अनेकांना या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले. 

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले आहेत. यातील काही प्रवाशांचा शोध घेण्यात आला. तसेच त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ११४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने देशातील १० प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी सहा जण नव्या कोरोनाचे पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.