इथे लग्नाला एक मुलगी मिळत नाही, 66 वर्षाच्या व्यक्तीला 17 बायका कशा मिळाल्या?

सात महिन्यांनंतर, रमेश भुवनेश्वरला परतला, त्याला वाटले की आतापर्यंत सर्व काही शांत झालं असावं. परंतु त्याला हे माहित नव्हतं की...

Updated: Feb 20, 2022, 04:48 PM IST
इथे लग्नाला एक मुलगी मिळत नाही, 66 वर्षाच्या व्यक्तीला 17 बायका कशा मिळाल्या? title=

मुंबई : कधी डॉक्टर तर कधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून १७ महिलांची तस्करी करणाऱ्या एका धूर्त व्यक्तीला भुवनेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. रमेश चंद्र स्वेन असे या 66 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. याला रविवारी रात्री उशिरा भुवनेश्वरच्या खंडगिरी भागातील एका अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली आणि सोमवारी त्याची न्यायालयीन कोठडीत नेण्यात आले. महिलांची फसवणूक करणाऱ्या रमेशवर आठ राज्यातील 17 महिलांशी फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे.

रमेशच्या अटकेबाबत माहिती देताना डीसीपी दास म्हणाले, "आम्ही अनेक दिवसांपासून या व्यक्तीचा शोध घेत होतो आणि त्याला पकडण्यासाठी आम्ही सापळा रचला होता. पण तो अनेक महिन्यांपासून भुवनेश्वरच्या बाहेर राहत होता आणि त्याचा मोबाईल ही नंबरही बदलला होता. त्यामुळे त्याला पकडणे शक्य झाले नाही.'"

पुढे डीसीपी म्हणाली "शेवटी रविवारी आम्हाला तो भुवनेश्वरला आल्याचे सूत्रांकडून समजले आणि आम्ही त्याच रात्री त्याच्या खंडगिरी अपार्टमेंटमधून त्याला पकडले."

खरेतर रमेशने फसवणूक केलेल्या 17 महिलांपैकी शेवटच्या महिलेनं, त्याच्या या फसवणूकीबद्दल पोलिसात तक्रार केली.

स्वत:ला आरोग्य मंत्रालयाचे उपमहासंचालक असल्याचे सांगून रमेश यांनी या महिलेशी संबंध ठेवले आणि त्यानंतर 2020 मध्ये कुबेरपुरीच्या आर्य समाज मंदिरात तिच्याशी लग्न केले. काही दिवस दिल्लीत राहिल्यानंतर रमेश आपल्या नववधूसह भुवनेश्वरला आला आणि खंडगिरी येथील एका अपार्टमेंटमध्ये राहू लागला.

भुवनेश्वरमध्ये राहात असताना दिल्लीतील या महिलेला रमेश आधीच विवाहित असल्याचे कळले. याबद्दल पूर्ण माहिती मिळवल्यानंतर आणि खात्री पटल्यानंतर तिने 5 जुलै 2021 रोजी भुवनेश्वरमधील महिला ठाण्यात रमेशविरुद्ध तक्रार दाखल केली आणि ती स्वतः दिल्लीला परतली.

भुवनेश्वर पोलिसांनी रमेशविरुद्ध कलम ४९८ (ए), ४१९, ४६८, ४७१ आणि ४९४ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. पण रमेशला ही गोष्ट कळली असावी. म्हणून तो मोबाईल नंबर बदलून भुवनेश्वरमधून गायब झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी तो गुवाहाटी येथे राहणाऱ्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता.

सात महिन्यांनंतर, रमेश भुवनेश्वरला परतला, त्याला वाटले की आतापर्यंत सर्व काही शांत झालं असावं. परंतु त्याला हे माहित नव्हतं की, पोलिस अजूनही त्याच्यापाठीशी आहे. पोलिसांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे अखेर वर्षानुवर्षे महिला आणि पोलिसांना चकमा देणारा रमेश पोलिसांच्या हाती लागला.

महिलांना कसं फसवायचा?

रमेश आपली शिकार अतिशय काळजीपूर्वक निवडायचा. आपली शिकार शोधण्यासाठी, तो बहुतेक विवाह साइट्सचा अवलंब करायचा. वय होऊनही लग्न न झालेल्या किंवा घटस्फोट झालेल्या किंवा पतीपासून विभक्त झालेल्या स्त्रियांचीच तो निवड करत होता. मात्र तो अशाच महिला निवडायचा ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे.

रमेश हा डॉक्टर नाही, पण त्याने कोची येथून पॅरा मेडिकल, लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि फार्मसीचा डिप्लोमा कोर्स केला, त्यामुळे त्याला वैद्यकीय शास्त्राविषयी थोडेसे ज्ञान होते. या माहितीचा वापर महिलांना फसवण्यासाठी तो करायचा.

महिलांशी खोटे लग्न करून फसवणूक करण्याबरोबरच रमेशने इतर अनेकांची फसवणूक केली. त्याने देशातील अनेक तरुणांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवले आणि त्यांच्याकडून पैसे उकळले. या संदर्भात त्याला हैदराबाद पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अटकही केली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा फसवणुकीचे काम सुरू केले होते.