संपूर्ण देशभरात बुधवारी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. आपल्या भावाला राखी बांधत बहिणी हा दिवस साजरा करतात. बहिण-भावाचा हा सण साजरा करताना सर्व रुसवे फुगवे बाजूला ठेवत फक्त आनंदाचे क्षण साजरे केले जातात. लहानपणासून एकमेकांना साथ देणारे बहिण-भाऊ आयुष्यभर असेच गुण्यागोविंदाने राहू अशी अपेक्षा व्यक्त करत असतात. पण याच दिवशी एका बहिणीवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याने सणाच्या दिवशी बहिण शोकसागरात बुडाली. या घटनेनंतर सगळेच गहिवरले होते.
तेलंगणाच्या पेद्दापल्ली येथे ही घटना घडली आहे. एका बहिणीसाठी हा सण यापुढे कायम दु:खाची आठवण करुन देणारा ठरला. रक्षाबंधनाच्या दिवशीच तिच्या भावाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. डोळ्यातील अश्रू थांबत नसतानाही बहिणीने त्याच अवस्थेत मृत भावाच्या हाताला राखी बांधली आणि शेवटचा निरोप घेतला. हा क्षण पाहिल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पेद्दापल्ली गावात राहणाऱ्या चौधरी कनकैया नावाच्या व्यक्तीला कथितपणे ह्रदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांचं निधन झालं. निधन झाल्याचं समजताच त्यांच्या घऱात आक्रोश सुरु झाला होता. बहिणीलाही आपल्या भावाचं निधन झाल्याचं समजलं, तेव्हा रडून रडून ती बेहाल झाली होती. संपूर्ण कुटुंबाला हे दु:ख पचवता येत नव्हतं.
चौधरी कनकैया यांच्या निधनानंतर कुटुंब शोकसागरात बुडालं होतं. याचदरम्यान चौधरी कनकैया यांची छोटी बहिण मृतदेहाजवळ पोहोचली. यानंतर तिने मृत भावाच्या हातावर राखी बांधत आपलं शेवटचं रक्षाबंधन साजरं केलं आणि अखेरचा निरोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत चौधरी कनकैया यांच्या मृतदेहाशेजारी त्यांची बहिण गौरम्मा पत्तेदू आणि इतर नातेवाईक उभे असल्याचं दिसत आहे.
बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधल्यानंतर उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते. बहिणीने भावाला अंतिम निरोप दिल्यानंतर मृत भावावर अंत्यसंस्कार करण्यात आले.