Viral Video: सोशल मीडिया (Social Media) म्हटलं की तिथे रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामधील काही व्हिडीओ तुम्हाला भावूक करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत तरुण आपल्या म्हाताऱ्या आईला खांद्यावर उचलून फिरण्यासाठी जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी भावनिक झाले आहेत. तरुण पाच वर्षांनी आपल्या आईला भेटला असता अनेक गोष्टी बदलल्या होत्या. यानंतर त्याने आईला घेऊन फिरायला जाण्याचा निर्णय घेतला.
रोजन परम्बिल असं या व्यक्तीचं नाव आहे. रोजन हा स्वित्झर्लंडला असतो. पाच वर्षांनी जेव्हा तो घरी परतला तेव्हा आपली आई म्हातारी आणि अशक्त झाल्याचं पाहून त्याचं मन भरुन आलं. त्याची आई वयामुळे आता अनेक गोष्टी विसरु लागली होती. यानंतर त्याने आपल्या आईला घेऊन फिरायला जाण्याचा निर्णय घेतला.
Humans of Kerala ने इंस्टाग्रामला हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत रोजनने आपल्या आईल खांद्यावर उचलल्याचं दिसत आहे. यानंतर रोजन आईला खांद्यावरुन नेऊन गाडीत बसवतो. यावेळी एक महिला त्याच्या आईच्या हातात चहाचा कप देत असल्याचं दिसत आहे. गाडीत बसून प्रवासाला निघण्याआधी रोजन आईसह एक फोटो काढतो. तसंच नंतर तो चहाच्या मळ्यात आईला खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहे.
रोजनने सांगितलं आहे की, "मी 5 वर्षांनी अमाचीला भेटलो. ती आता अजून म्हातारी आणि अशक्त झाली आहे. तिने आता बाहेर जाणं सोडून दिलं आहे. म्हणून मी तिची तयारी केली आणि कारमध्ये बसण्यास मदत केली. आम्ही तिच्या घरी गेलो होतो. ती आता अनेक गोष्टी विसरली आहे, पण मी विसरलेलो नाही".
रोजनने आपल्या आईला स्वित्झर्लंडमध्येही फिरवलं आहे. त्याच आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी त्याने ही ट्रीप आयोजित केली होती. आईचं वय जास्त असल्याने आणि तब्येतीच्या कारणामुळे ती दूर जाऊ शकत नसल्याने रोजन जवळच फिरण्यासाठी घेऊन गेला होता.
"काही वर्षांपूर्वी मी अमाचीला स्वित्झर्लंडला घेऊन गेलो होतो. आम्ही युरोपात फिरलो होतो. नव्या जागा पाहिल्यानंतर तिला फार आनंद झाला होता. पण कोविडमुळे मी 5 वर्षं भारतात येऊ शकलो नव्हतो. अमाचीला पाहिल्यानंतर माझं मन भरुन आलं होतं. तिचे केस आता जास्तच पांढरे झाले होते. ती अशक्त झाली होती आणि नीट उभीही राहू शकत नव्हती. ती अनेक वर्षं चर्चमध्येही गेली नसल्याचं तिने सांगितलं. यानंतर मी तिला बाहेर घेऊन जायचं ठरवलं," असं रोजनने सांगितलं आहे.
रोजन यांनी सांगितलं आहे की "मी स्वित्झर्लंडमध्ये वृद्धाश्रमात काम करतो. त्यामुळे मला अनुभव आहे. मी आईला आंघोळ घातली, कपडे घातले आणि कारमधून नेण्याचं ठरवलं. अनेकजण असं करु नको सांगत होते पण मी ऐकलं नाही. मी तिला खांद्यावर उचलून गाडीत बसवलं. तिला 20 किमी दूर तिच्या गावी नेलं". हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.