भारतात आलेल्या दिवसापासून शरणार्थींना नागरिकत्व मिळेल- अमित शाह

 जनता या विधेयकाच्या समर्थनात आहे. जनादेशापेक्षा मोठं काही नसतं असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

Updated: Dec 11, 2019, 04:01 PM IST
भारतात आलेल्या दिवसापासून शरणार्थींना नागरिकत्व मिळेल- अमित शाह  title=

नवी दिल्ली : लोकसभेत संमती मिळाल्यानंतर राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाची चर्चा सुरु आहे. हे विधेयक शरणार्थिंना त्यांचे अधिकार आणि सन्मान देणारे असून कोट्यावधी लोकांसाठी ही उमेद असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले. शरणार्थी ज्या तारखेला भारतात आले आहेत त्यांना त्यादिवसापासूनचे नागरिकत्व दिले जाईल असे अमित शाह यांनी म्हटले. तुम्ही मतांचे राजकारण करत असल्याचे काहीजण म्हणताहेत. पण जनता या विधेयकाच्या समर्थनात आहे. जनादेशापेक्षा मोठं काही नसतं असेही ते म्हणाले.

काही लोक देशातील जनतेमध्ये संभ्रम पसरवत आहेत की हा निर्णय देशातील मुस्लिमांच्या विरोधात आहे. पण कशाप्रकारे हे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे ? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला. 

विरोधकांचा गोंधळ 

राज्यसभेत या विधेयकावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसने या विधेयकाला विरोध करताना सदनात गोंधळ घातला. दरम्यान, या विधेयकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारची बाजू मांडली. हे विधेयक कसे चांगले आहे, यावर त्यांचा जोर दिसून येत होता. हे विधेयक कोणाच्याविरोधात नाही, हे वारंवार सांगितले. 

आसाममधील नागरिकांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. धर्माच्या आधारावर प्रतारणा सहन केल्यानंतर ज्या लोकांनी भारतात आश्रय घेतलाय अशा लोकांसाठी हे विधेयक आहे. या विधेयकामुळे कोट्यवधींना दिलासा मिळाला आहे. निर्वासितांना हक्क देणारे विधेयक असल्याचे अमित शाह यांनी म्हटले.