Video : आता मला सहन होत नाही, आंध्रचे माजी मुख्यमंत्री ढसाढसा रडले

सत्तेत येणार नाही तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही! चंद्रबाबूंनी घेतली प्रतिज्ञा

Updated: Nov 19, 2021, 04:57 PM IST
Video : आता मला सहन होत नाही, आंध्रचे माजी मुख्यमंत्री ढसाढसा रडले title=

आंध्रप्रदेश : तेलुगु देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी आज भीष्मप्रतीज्ञा केली. आंध्र प्रदेश विधानसभेत (Andhra Pradesh) सत्तेत परत येईपर्यंत प्रवेश न करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यावेळी भावूक झालेल्या चंद्राबाबू यांनी सांगितलं, सत्ताधारी वायएसआर (YSR) काँग्रेस सदस्यांकडून सतत सुरु असलेल्या टीका आणि निंदानालस्तीमुळे आपण व्यथित झालो आहोत. 

चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून मी अपमानाचा सामना करत आहे, परंतु मी शांत राहिलो आहे. आज त्यांनी माझ्या पत्नीवरही आक्षेपार्ह टीका केली आहे. मी नेहमीच आदर आणि सन्मानासाठी उभा राहिलो आहे. मला आता सहन होत नाही, हे सांगताना चंद्राबाबूंच्या अश्रुंचा बांध फुटला. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सातत्याने सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही चंद्राबाबू यांनी केला आहे. 

विधासभेत सभापती तम्मिनेनी सीताराम यांनी माईक बंद केल्यानंतरही चंद्राबाबू बोलत होते. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी नायडू यांच्या कृतीला ‘नाटक’ असल्याचं म्हटलं आहे. 

कृषी क्षेत्रावरील संक्षिप्त चर्चेदरम्यान सभागृहात दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. नंतर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांसोबत आपल्या चेंबरमध्ये बैठक घेतली. या बैठकीत चंद्राबाबू अत्यंत भावूक झाले. चंद्राबाबूंच्या या कृतीने स्तब्ध झालेल्या टीडीपी आमदारांनी नायडू यांचे सांत्वन केल्यानंतर ते सर्व सभागृहात परतले.