Araria Bridge Collapse: बिहारमध्ये एक पूल उद्घाटनाआधीच कोसळला आहे. अररिया जिल्ह्यातील सिक्टी परिसरात ही घटना घडली आहे. बाकरा नदीच्या पडरिया घाटावर तब्बल 12 कोटी रुपये खर्चून पुल बांधण्यात आला होता. मात्र, उद्घाटनापूर्वीच या पुलाचा काही भाग नदीत कोसळला आहे. या प्रकरणात ज्या अधिकाऱ्याला पुलाच्या बांधकामाचे निरीक्षण करण्यास सांगितले होते त्या अधिकाऱ्याने बकरा नदीच्या प्रवृत्तीमुळं पुल कोसळल्याचा निष्कर्ष दिला आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सिक्टी परिसरात बकरा नदीवर ग्रामीण विभागाने 12 कोटी रुपये खर्चून नदीवर एका पुलाचे बांधकाम केले. ग्रामीण कार्य विभागाचे कार्यपालक अभियंता इंजिनियर आशुतोष कुमार रंजन यांनी या पुलाच्या बांधकामाच्या तपासणीची जबाबदारी मिळाली होती. त्यांनी पुलाच्या तपासणीनंतर म्हटलं आहे की, नदीची प्रवृत्ती वक्र असल्यामुळं पुल कोसळू शकतो. दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या या निष्कर्षावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. नदीच्या प्रवाहामुळं पुल कोसळला हे एकून काहींनी त्यावर संतापही व्यक्त केला आहे.
पुल कोसळत असतानाचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. त्यात स्पष्टपणे दिसत आहे की, पुलाच्या बांधकामासाठी निष्कृष्ट दर्जाचे सामान वापरण्यात आले आहे. त्यामुळंच पूल कोसळला आहे. मंगळवारी ही घटना घडली होती. मात्र, विभागीय अभियंतांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये. या उलट या अपघाताप्रकरणी नदीलाच दोषी ठरवले आहे. यामुळं परिसरातून एकच संताप व्यक्त होत आहे.
मंगळवारी दुपारी हा अपघात घडला आहे. 182 मीटर लांबीचा हा पूल तीन भागात बांधण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गंत बांधण्यात आलेल्या या पुलाची किंमत 7.79 कोटी रुपये होती. 182 मीटर लांबीच्या या पुलाचे बांधकाम 2024मध्ये सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला या पुलासाठी 7 कोटी 80 लाख रुपये खर्च आला होता. मात्र, नंतर नदीचा मार्ग बदलल्याने खर्च वाढून 12 कोटी रुपये झाला होता. मंगळवारी या पुलाचे तीन खांब नदीत कोसळले आणि मग संपूर्ण पूलच नदीत कोसळला.