ब्लू व्हेल गेम: शाळकरी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ब्लू व्हेल या ऑनलाइन गेमने जगभरातील तरुणांना वेड लावल्याचं दिसत आहे. हा गेम खेळण्याच्या नादात आणखीन एका विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 11, 2017, 09:53 AM IST
ब्लू व्हेल गेम: शाळकरी विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न title=

इंदूर : ब्लू व्हेल या ऑनलाइन गेमने जगभरातील तरुणांना वेड लावल्याचं दिसत आहे. हा गेम खेळण्याच्या नादात आणखीन एका विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्लू व्हेल गेमची नशा चढलेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. इंदूरमध्ये गुरुवारी एका शाळकरी विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने त्याच्या मित्रांनी त्याला वाचवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्लू व्हेल गेम खेळण्याच्या नादात सातवीत शिकणा-या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान त्याच्या मित्रांनी त्याला इमारतीवरुन खाली नेलं. त्यानंतर चौकशी केली असता समोर आलं की, हा विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून ब्लू व्हेल गेम खेळत होता. 

या विद्यार्थ्याने ब्लू व्हेल गेमची ५० स्टेज पूर्ण केल्या होत्या आणि त्यानंतरच्या स्टेजवर पोहोचण्यासाटी त्याला इमारतीवरुन उडी मारायची होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर या विद्यार्थ्याला पालकांकडे देण्यात आले असून आता त्याची मानसोपचार तज्ञांकडे त्याचं काऊंसिलिंग करण्याचा विचार सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका विद्यार्थ्याने ब्लू व्हेल गेम खेळण्याच्या नादात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.