जिल्हाधिकारी मुकेश यांनी केली आत्महत्या

बिहारमधील बक्सर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 11, 2017, 09:15 AM IST
जिल्हाधिकारी मुकेश यांनी केली आत्महत्या title=

नवी दिल्ली : बिहारमधील बक्सर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी गुरुवारी सायंकाळी गाझियाबाद येथे आत्महत्या केली. मुकेश पांडेय यांचा मृतदेह गाझियाबाद रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर दूर असलेल्या कोटगावजवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला. मुकेश पांडेय यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश पांडेय यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक मेसेज पाठवला होता. यामध्ये म्हटलं होतं की, मी आयुष्याला कंटाळलो असून आत्महत्या करण्यासाठी जात आहे.

ट्रेनखाली उडी मारुन केली आत्महत्या

मुकेश पांडेय यांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटूंबियांना व्हॉट्सअप मेसेज केला की, ते आत्महत्या करण्यासाठी जात आहेत. यानंतर तात्काळ त्यांच्या कुटूंबियांनी पोलिसांना कळवलं. दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मुकेश पांडेय यांनी ट्रेनखाली उडी घेऊन जीवन संपवलं होतं.

असा होता व्हॉट्सअप मेसेज

मुकेश पांडेय यांनी लिहिलं होतं की, मी दिल्लीतील जनकपुरी येथील डिस्ट्रिक्ट सेंट्रल मॉलच्या दहाव्या मजल्यावरुन आत्महत्या करण्यास जात आहे. माझी सुसाईड नोट दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमधील रुम नंबर ७४२ मधील माझ्या रुममध्ये ठेवली आहे. मला माफ करा मी तुमच्या सर्वांवर खुप प्रेम करतो.