दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने प्रत्येक घराची साफसफाई केली जाते. पण कधी या साफसफाईमधून कोटी रुपये मिळाल्याचं ऐकलय का? दिवाळीच्या साफसफाईत जमा झालेल्या कचऱ्यातून केंद्र सरकारला (Central Government) 254 कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या विभागांशी संलग्न कार्यालयांमधून बाहेर पडलेल्या रद्दीच्या (junk) विक्रीतून ही रक्कम मिळाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (jitendra singh) यांनी मंगळवारी ही माहिती दिला. ही स्वच्छता मोहीम दिवाळीपूर्वी तीन आठवड्यापूर्वी सुरु करण्यात आली होती. त्यातून निघालेली रद्दी विकली गेली आणि अडीचशे कोटींहून अधिक रक्कम मिळाली. याशिवाय 37 लाख चौरस फूट जागाही रिकामी झाली आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले. (central government earned 254 crores from the junk in cleaning )
या मोठ्या जागेवर ही सर्व रद्दी ठेवण्यात आली होती. आता ही जागा अन्य काही कामांसाठी वापरता येणार आहे. स्वच्छता अभियानाच्या (swachh bharat mission) दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्यापासून केंद्र सरकारचे अनेक विभाग स्वच्छता मोहिमेत गुंतले होते. 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व विभाग स्वच्छता मोहीम राबवत असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. या अंतर्गत आता वापरात नसलेल्या फाईल्स व इतर साहित्य विकले जात आहे. याशिवाय पर्यावरणाची हानी होणार नाही अशा योग्य गोष्टींना प्राधान्य दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील स्वच्छता मोहिमेने जनआंदोलनाचे रूप धारण केले आहे, असेही जितेंद्र सिंह (jitendra singh) म्हणाले.
या कालावधीत कामेही वेगाने पूर्ण झाल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. एकूण 40 लाख फायलींचा आढावा घेण्यात आला. 3 लाखांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. याशिवाय 588 नियम शिथिल करण्यात आले. स्वच्छता मोहिमेबाबत सर्व मंत्रालयांमध्ये उत्साह दिसून आला. या दरम्यान केंद्र सरकारने पुढील दीड वर्षात 10 लाख भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 75 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिली, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले.
तसेच केंद्र सरकारने सुमारे 500 नियम आणि प्रक्रिया सुलभ केल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत सुमारे तीन लाख सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी व्ही श्रीनिवास (V Srinivas) यांनी दिली. यापैकी 4500 सार्वजनिक तक्रारी कैद्यांशी संबंधित होत्या. 'ही मोहीम मोठी आणि विस्तृत आहे. प्रत्येक पावलाचा भारतातील लाखो नागरिकांना फायदा झाला आहे,' असे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव (DARPG) व्ही श्रीनिवास म्हणाले.
दरम्यान, 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत केंद्र सरकारसह कार्यालयांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. व्ही. श्रीनिवास यांनी सांगितले की, 61,532 ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.