कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 'या' उपाययोजना

कोरोनाचे संकट दिवसेदिवस अधिक वाढत असताना आता केंद्र सरकारनं आणखी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. 

Updated: Mar 19, 2020, 08:20 PM IST
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 'या' उपाययोजना title=

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट दिवसेदिवस अधिक वाढत असताना आता केंद्र सरकारनं आणखी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परदेशातून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या कमी करणं आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी काही महत्वाचे सहा उपाय केले आहेत. त्यात परदेशातून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांना आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान भारतात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे.

केंद्राच्या माहिती खात्यामार्फत जाहीर सहा उपाययोजना

१. २२ मार्चपासून पुढचा आठवडाभर भारताबाहेरील प्रवासी विमान भारतात उतरण्यास परवानगी नाही

२. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला सरकारकडून दिला जाणार आहे. लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना यातून वगळण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी घराबाहेर पडता येईल.

३. १० वर्षांखालील मुलांना घरीच ठेवावं आणि त्यांना घराबाहेर पडू देऊ नये असा सल्ला देण्यात आलाय.

४. रेल्वे आणि नागरी हवाई वाहतुकीमध्ये प्रवासासाठी दिलेल्या सर्व सवलती रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग यांच्या सवलती मात्र कायम ठेवण्यात आल्या आहेत.

५. रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी ५० टक्के सवलत‌ बंद करण्यात आलीय.

६, अत्यावश्यक सेवा वगळून खाजगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरूनच काम करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारला सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या ब आणि क वर्ग कर्मचाऱ्यांना एक आठवड्याआड आठवडाभर काम करण्यास सांगण्यात आले असून त्यांच्या वेळाही त्यानुसार बदलण्यास सांगण्यात आले आहे.