मंत्रिपदाची अपेक्षा प्रत्येकालाच असते- बाळासाहेब थोरात

काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी आमदारांचा आग्रह असला तरी रस्सीखेच नाही.

Updated: Dec 2, 2019, 07:21 PM IST
मंत्रिपदाची अपेक्षा प्रत्येकालाच असते- बाळासाहेब थोरात title=

नवी दिल्ली: काँग्रेसचे अनेक आमदार मंत्रिपदाची इच्छा बाळगून आहेत. राजकारणात असे वाटणे साहजिकच आहे. त्यामुळेच प्रत्येक आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असतो, असे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्यादृष्टीने काहीतरी सकारात्मक घडेल, असे सर्वांना वाटत होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्याना हे मिळणार सरकारी बंगले

मात्र, सोनिया गांधी यांच्या भेटीनंतरही बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ठोसपणे बोलण्यास नकार दिला. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, ते सांगता येत नाही. मी सोनिया गांधी यांची केवळ सदिच्छा भेट घेतली. राज्यातील मंत्रीपदांसंदर्भात मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल. आपल्याला मंत्रिपद मिळावे, असे प्रत्येक आमदाराला वाटते. त्यामुळे प्रत्येक आमदार त्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी आमदारांचा आग्रह असला तरी रस्सीखेच नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

'अफवा पसरवू नका, पंकजा भाजपा सोडणार नाहीत' - चंद्रकांत पाटील

२८ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी पार पडला होता. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या नाना पटोले यांची निवड झाली होती. मात्र, उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप जाहीर होणे, अजूनही बाकी आहे.