नवी दिल्ली : Ghulam Nabi Azad resigns: देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानी राजीनामा पत्र पाठवले आहे. दरम्यान, त्यांनी राजीनाम्याचं पत्र लिहिताना राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सोनिया गांधींना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिले आहे की, अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझे जुने संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी पक्षनेतृत्वाने देशभर काँग्रेस जोडो यात्रा करावी. राहुल गांधींची खिल्ली उडवत गुलाम नबी आझाद म्हणाले की, राहुल गांधी जेव्हापासून राजकारणात उतरले आणि जानेवारी 2013 मध्ये पक्षाचे उपाध्यक्ष बनले तेव्हापासून त्यांनी आधीच स्थापन केलेली जुनी सल्लागार प्रणाली नष्ट केली. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केले.
गुलाम नबी आझाद बराच काळ काँग्रेसवर नाराज होते. काँग्रेसच्या नाराज नेत्यांच्या G-23 गटातही त्यांचा सहभाग होता. जी-23 गट सातत्याने काँग्रेसमध्ये अनेक बदलांची मागणी करत आहे. यापूर्वी काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांना सपाने राज्यसभेवरही पाठवले आहे.