नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारत 21 दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे. देशभरात आरोग्य सेवा अतिशय सतर्क करण्यात आल्या आहेत. डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता, रुग्णांची सेवा करत आहेत. अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी हजर आहेत.
अशातच आता तमिळनाडू सरकारने कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. या कर्मचाऱ्यांना बोसनमध्ये एक महिन्याचा पगार देण्यात येणार आहे.
तमिळानाडूचे मुख्यमंत्री ई.के.पलानीसामी यांनी, डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना बोनससह, रेशनकार्ड धारकांना 1000 रुपये, तांदुळ, साखर आणि इतर आवश्यक वस्तू मोफत देण्याची घोषणा केली आहे.
रेशनच्या दुकानांत गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबात एक टोकन देण्यात येणार. या टोकनच्या आधारे त्यांना रेशन देण्यात येणार आहे.
तमिळनाडूआधी बिहार सरकारनेही, नितिश कुमार यांनी मंगळवारी संकटाच्या काळात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.