दिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले

Delhi Crime : दिल्लीत एका तरुणीने माथेफिरु प्रियकरावरुन पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं आहे. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

आकाश नेटके | Updated: Jan 6, 2024, 11:29 AM IST
दिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

Delhi Crime : दिल्लीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने तिच्याच मामेभावाला जिवंत जाळलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दुसरीकडे शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह पोलिसांनी कुटुंबियांच्या हाती सोपवला आहे.

राजधानी दिल्लीतील वजिराबाद परिसरात एका तरुणीने एकतर्फी प्रेमात वेड्या प्रियकराची पेट्रोल ओतून हत्या केली आणि त्याला जिवंत जाळले. तरुण सातत्याने त्रास देत असल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी शुक्रवारी खुनाच्या कलमान्वये एफआयआर दाखल केला आहे. तरुण आणि तरुणी भाऊ-बहिणीच्या नात्यात होते. सध्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

अब्दुल्ला असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अब्दुल्ला हा त्याच्या कुटुंबासोबत संगम विहार भागात राहत होता. अब्दुल्ला एका ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. अब्दुल्ला याच्या मामाचे कुटुंबही या परिसरात राहते. घरात कोणी नसताना अब्दुल्लाच्या चुलत बहीणीने त्याला गुरुवारी निरोप पाठवून घरी बोलावले होते. अब्दुल्ला मामाच्या घरी पोहोचल्यावर सानियाने त्याला सोफ्यावर बसवले आणि चहा घेण्याच्या बहाण्याने आत गेली. काही वेळाने तिने बाटलीत पेट्रोल आणून अब्दुल्लावर ओतले. यानंतर तिने काडीपेटीने अब्दुल्लाला पेटवून दिले.

आग लागल्यानंतर अब्दुल्ला लगेचच घरातून बाहेर पळाला आणि रस्त्यावर धावू लागला. त्याने रस्त्यावरच कपडे काढून फेकून देण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत तो चांगलाच भाजला होता. स्थानिक लोकांनी कशीतरी आग विझवली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गंभीर भाजलेल्या अवस्थेत अब्दुल्लाला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असतानाच शुक्रवारी पहाटे अब्दुल्लाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी हत्येचे कलम जोडले.

पोलिसांना संशय आहे की, एकतर्फी प्रेमातून तरुणीने अब्दुल्लाची हत्या केली आहे. दुसरीकडे, तरुणीला फसवण्यासाठी अब्दुल्लाने असा आरोप केल्याचेही पोलिसांना वाटत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अब्दुल्लाचा फोनही तपासला जात आहे. 

दरम्यान, अब्दुल्लाचा मृत्यू होण्यापूर्वी पोलिसांनी त्याची व्हिडीओग्राफी केले होते. शेवटच्या वक्तव्यात अब्दुल्लाने तरुणीवर पेट्रोल टाकून त्याला जाळल्याचा आरोप केला होता. मात्र, त्याने याचे कारण सांगितले नाही. तपासाशी संबंधित एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात अब्दुल्लाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी तरुणीचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी अब्दुल्लाने त्याच्या हाताची नस कापली होती.