दिल्ली : दिल्लीच्या नांगलोई भागात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली. गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी अनेक जण दूर्गामातेच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात व्यग्र होते. याच दरम्यान काही जणांना एक लहानगा जीव बेवारसरित्या आढळला. लोकांनी जवळ जाऊन पाहिलं असता त्यांना एक चिमुरडी आढळली. लोकांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
गुरुवारी सकाळी नांगलोई भागातून एका व्यक्तीनं एक चिमुकली बेवारसरित्या आढळल्याचं पोलिसांना फोनवरून कळवलं. पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या जीवाला आपल्या ताब्यात घेतलं. एका टॉवेलमध्ये गुंडाळून पोलिसांनी हॉस्पीटल गाठलं.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या बाळाचा जन्म एक दिवस अगोदर झाला होता. वेळीच पोलिसांच्या ताब्यात आली नसती तर या जीवाला धोका होता.
रुग्णालयातून पोलिसांनी या चिमुरडीला 'चाइल्ड वेल्फेअर कमेटी'समोर हजर केलं. इथं या चिमुरडीला नांगलोईच्याच एका पाळणाघरात पाठवण्यात आलं.
ही चिमुरडी दूर्गामातेच्या विसर्जनादरम्यान आढळल्यानं पोलिसांनी तिचं नामकरण 'दुर्गा' असं केलंय.
या संदर्भात पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून या बाळाचे आई-वडील कोण आहेत? आणि तिला का फेकण्यात आलं? याचा शोध ते घेत आहेत.