मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे एकाएकी नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आणि राज्याचं राजकारण खवळून निघालं. फक्त शिंदेच नव्हे, तर त्यांच्यासोबतच शिवसेनेचे काही आमदारही असल्याचं सांगितलं गेलं. (Eknath Sinde and missinhg mlas first photograph)
इथे सत्तेच्या राजकारणाची गणितं प्रत्येकजण आपल्या परिनं सोडवू लागलेला असतानाच तिथे सूरतमध्ये हालचालींना वेग आला. कारण, आमदारांच्या मोठ्या गटासोबत शिंदे सूरतमध्येच थांबले होते.
पक्षात बंडखोरी केल्याप्रकरणी शिंदेना शिवसेनेकडून विधीमंडळाच्या गटनेते पदावरून हटवण्यात आलं. मिनिटामिनिटाला या सर्व घडामोडी गडत असतानाच एक फोटो समोर आला, जिथे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना एकत्र पाहिलं गेलं.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, या फोटोंमध्ये शिंदे यांच्यासह असणारे आमदार स्पष्टपणे दिसत आहेत. आता हे आमदार कोण हेच जनता निरखून पाहत आहे.
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये सत्तेतील घटकपक्ष असणाऱ्यांपैकी बच्चू कडूसुद्धा आहेत. त्यामुळं शिंदेंना त्यांचाही पाठिंबा असल्याचं स्पष्ट होत आहे.
दरम्यान, मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर सूरतमध्ये हालचालींना वेग आला आणि तीन वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना गुवाहाटीच्या दिशेनं हलवण्यात आलं.
विमानतळावर पोहोचताच शिंदेंना माध्यमांनी घेरलं, त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली, 'माझ्याकडचा गट हीच खरी शिवसेना आहे', असं म्हणत शिंदेंनी आपण बाळासाहेबांचं हिंदुत्त्वं पुढे नेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
आपल्यासोबतीनं तब्बल 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला. जाणकार आणि काही अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचा वेगळा गट शिंदे स्थापन करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गटाची माहिती राज्यपालांनाही देण्यात येणार आहे. मुंबईत आल्यानंतर शिंदे नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेच्या कोणत्या आमदारांची नावं 'नॉट रिचेबल' यादीत होती?
नितीन देशमुख
विश्वनाथ भोईर
किशोर पाटील
महिला आमदार लता सोनवणे (दिल्लीत)
तानाजी सावंत
चंद्रकांत पाटील (अपक्ष)
संजय राठोड
प्रताप सरनाईक
राजन साळवी
योगेश कदम
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
महेंद्र दळवी
भरत गोगावले
महेंद्र थोरवे