मी माफी मागणार नाही; राहुल गांधींनी भाजपची मागणी धुडकावली

जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून माझ्यावर चिखलफेक

Updated: Dec 13, 2019, 01:16 PM IST
मी माफी मागणार नाही; राहुल गांधींनी भाजपची मागणी धुडकावली

नवी दिल्ली: 'रेप इन इंडिया'च्या उल्लेखावरून मी कदापि माफी मागणार नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. ते शुक्रवारी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचा उल्लेख 'रेप कॅपिटल' केल्याची क्लीप माझ्याकडे आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAB)संसदेत मंजूर झाल्यामुळे ईशान्य भारतात आग लागली आहे. या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपकडून माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. मात्र, मी माफी मागणार नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केले. 

राहुल गांधी यांनी गुरुवारी झारखंड येथील प्रचारसभेत हे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा संदर्भ देत मोदी सरकारवर आसूड ओढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया'ची हाक दिली होती. मात्र, देशातील आजची परिस्थिती पाहता त्याचे रूपांतर 'रेप इन इंडिया'त झाल्याची जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली होती. 

राहुल यांच्या या वक्तव्यावरून शुक्रवारी भाजप खासदारांनी लोकसभा दणाणून सोडली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा नेता इतरांना भारतीय महिलांवर बलात्कार करा, असे आवाहन करताना दिसत आहे. राहुल गांधी यांना देशवासियांना हाच संदेश द्यायचा आहे का, असा सवाल स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. यानंतर भाजपच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. राहुल गांधी यांच्यामुळे देशाची मान खाली गेली आहे. त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली होती.