भारत-चीन संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो - जयशंकर

 भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

Updated: Sep 4, 2020, 08:33 AM IST
भारत-चीन संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो - जयशंकर  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. तोडगा निघणे हे केवळ भारत चीनसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले. 

भारत आणि चीन यांच्यात याआधीच सीमा करार झाले आहेत. ते सीमा करार दोन्ही देशांनी पाळणे गरजेचे आहे, असे त्यांनी चीनला ठणकावले आहे. सीमेवर जे घडते त्याचे पडसाद दोन्ही देशांच्या संबंधांवर पडतातच, ते तुम्ही टाळू शकत नाही असंही ते म्हणाले.  'The India Way: Strategies For An Uncertain World' हे जयशंकर यांनी पुस्तक लिहीले आहे. त्याच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यानंतर जयशंकर यांनी हे विधान केले आहे. 

भारत आणि चीन यांनी सीमा प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे. चीन आणि भारताने फौजा माघारी घेऊन आपल्या सीमाभागात पोहोचले पाहिजे. तरच नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्तापित होईल. हाच मुत्सुद्दीपणाचा मुद्दा आहे. चीन भारताच्या मार्गात आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, द्विपक्षीय संबंधातील हा “सोपा काळ” नव्हता, परंतु ते म्हणाले की दोन्ही देशांना फौजा माघारी जाणे अत्यावश्यक आहे.

दरम्यान, गेल्या चार महिन्यांत पूर्व लडाखमधील सीमाभागातील तणावाची परिस्थिती आहे. चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. चीनने या भागात केलेल्या कारवायांमुळेच तेथील आजची स्थिती उद्भवली असल्याचे भारताने गुरुवारी म्हटले आहे. या संबंधातील सर्व मुद्दे संवादातून सोडवण्यास भारत बांधील असल्याचे सांगतानाच, वाटाघाटी हा सर्व मुद्दय़ांवर तोडगा काढण्याचा मार्ग आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते  अनुराग श्रीवास्तव म्हणाले.

फौजा माघारी घेऊन सीमाभागात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने भारताला सहकार्य करावे, असे आवाहन आम्ही चीनला करत असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी दोन्ही देशांचे कमांडर चर्चा करत असतानाच, चीनकडून खुरापती काढण्यात येत आहे. तो त्यात गुंतला आहे. चीनच्या या कारवायांनंतर, भारतीय लष्कराने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील किमान तीन सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या ठिकाणांवर आपली उपस्थिती आणखी मजबूत केली आहे.