नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवला असला तरी झोननुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे.
दिल्ली सरकारने पेट्रोलचे दर १.६७ रू प्रती लिटरने वाढवण्याचा निर्णय घेतला असून डिझेलच्या दरात ७.१० रू प्रती लिटर वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच नव्या दरानुसार दिल्लीत आज पेट्रोलचे दर ७१.२६रू प्रती लिटर तर डिझेलचे दर ६९.२९ रू प्रती लिटर इतके आहे.
एजेन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत एप्रिल महिन्यात पेट्रोलची विक्री ६१ टक्के तर डिझेलची विक्री ५७ टक्क्यांनी घसरली. शियाव इंधनांवर लागणारे कर देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे नागालँड,आसाम आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. नागालँडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कोरोना टॅक्स लावण्यात आला आहे.