'जय शाह आणि कंपनी' वादात...

वेबसाईटविरोधात जय शाह यांनी अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केलाय

Updated: Oct 9, 2017, 10:04 PM IST
'जय शाह आणि कंपनी' वादात...

मुंबई : केंद्रात भाजपाची सत्ता आली त्याच वर्षात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीला अचानक मोठा नफा झाल्याचं वृत्त एका संकेतस्थळानं प्रकाशित केल्यामुळे नवं वादळ निर्माण झालंय.

भाजपानं हे आरोप फेटाळले असले तरी यामुळे विरोधकांना टीकेसाठी नवा मुद्दा मिळालाय. या वेबसाईटविरोधात जय शाह यांनी अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केलाय.

'ना खाऊंगा ना खाने दुंगा'... हे पंतप्रधानांचं वाक्य चांगलंच प्रचलित आहे. लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी हे वाक्य अनेकदा उच्चारलं. रॉबर्ट वडेरा यांना टार्गेट करत गांधी घराण्यानं सत्तेचा गैरवापर कसा केला, हे सांगताना मोदी आणि भाजपा नेते थकलेले नाहीत. मात्र, आता आरोपांची ही लाट भाजपाच्या दारावरही धडका देऊ लगालीये. निमित्त ठरलंय ते भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीचं.

जय शाह यांच्या एका कंपनीनं मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल १६ हजार पट नफा कमावल्याचा सनसनीखेज आरोप एका न्यूज वेबसाईटनं केला आहे 'दी वायर' या संकेतस्थळानं कंपनी रजिस्ट्रारकडे सादर करण्यात आलेल्या वार्षिक अहवालाच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय.

या वृत्तानुसार, जय शाह यांच्या टेम्पल एन्टरप्राईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे २०१३-१४मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांमधले व्यवहार नगण्य होते आणि कंपनीनं अनुक्रमे ६२३० आणि १७२४ रुपयांचा तोटा दाखवला होता. २०१४-१५मध्ये कंपनीनं ५० हाजारांच्या भांडवलावर १८ हजार ७२८ रुपये नफा दाखवला. मात्र, २०१५-१६ मध्ये कंपनीच्या एकूण उलाढालीनं ८० कोटी ५० लाखांवर झेप घेतली.

मात्र, पुढल्या वर्षी जय शाह यांनी ही कंपनी बंद केल्याचं संकेतस्थळानं नमूद केलंय. या बातमीमुळे काँग्रेसला भाजपावर टीका करण्याची आयती संधी दिली आहे. नेमके गुजरातमध्ये असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आधी ट्विटरवर आणि नंतर जाहीर सभेमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं.

काँग्रेससह तमाम विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असताना भाजपाही आक्रमक झालाय. टेम्पल एन्टरप्रायजेसचे व्यवहार संपूर्णतः पारदर्शक असल्याचा दावा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलाय.

ही बातमी देणाऱ्या वेबसाईटचे मालक आणि पत्रकाराविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाची CBI चौकशीची विरोधकांची मागणी फेटाळून लावताना अब्रुनुकसानीच्या खटल्यात तत्थ्य समोर येईल, असं गोयल यांनी म्हटलंय. हे सांगताना रॉबर्ट वडेरा यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काँग्रेसनं काय केलं, हे सांगायला गोयल विसरलेले नाहीत.

दी वायरनं आपल्या बातमीमध्ये आकडेवारीच्या आधारे मोदी सरकारचं सत्ताग्रहण आणि जय शाह यांच्या कंपनीनं अचानक घेतलेली उसळी याची सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय. आता भाजपानं अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत या संकेतस्थळावर जोरदार पलटवार केला असला तरी गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक एखादा मुद्दा शोधत होते हे मात्र खरं.