कर्नाटक उच्च न्यायालयाचे (Karnataka High Court) न्यायमूर्ती वी श्रीशानंद (Justice Srishanand) यांनी बंगळुरुमधील (Bangalore) मुस्लीमबहुल भागाला 'पाकिस्तान' (Pakistan) म्हटल्याने वाद पेटला आहे. न्यायमूर्ती वी श्रीशानंद यांनी उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान केलेल्या टिप्पणीची दखल थेट सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सरन्यायाआधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणी अहवाल मागवला आहे. न्यायमूर्ती वी श्रीशानंद यांनी केलेल्या टिप्पणीचा व्हिडीओ व्हायरल झालेला असतानाच त्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान चर्चेत आहे. त्याचाही व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत न्यायमूर्ती वी श्रीशानंद महिला वकिलावर असंवेदनशील आणि आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला असून सुप्रीम कोर्टाला याचीही दखल घेण्यास सांगितलं आहे. व्हिडीओत न्यायमूर्ती श्रीशानंद विरोधी पक्षाच्या वकिलाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल महिला वकिलाला फटकारताना दिसत आहेत. न्यायमूर्ती श्रीशानंद महिला वकिलाला फटकारताना म्हणतात की, तुम्हाला विरोधी पक्षाबद्दल खूप काही माहित आहे. पुढच्या वेळी तुम्ही त्यांच्या अंडरगारमेंटचा रंग देखील सांगू शकता. कर्नाटक उच्च न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना त्यांनी ही वादग्रस्त टिप्पणी केली.
व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला न्यायमूर्ती पुरुष वकिलाला प्रश्न विचारतात की, “फक्त कोरा आहे म्हणून चेक लिहू शकत नाही. तो 3 वर्षांसाठी तुरुंगात जाईल. तुला ते समजतंय का?". यावर वकील आपल्याला कल्पना असल्याचं सांगतात. त्यानंतर न्यायाधीश त्यांना विचारतात की ज्या व्यक्तीचा उल्लेख आहे तो आयकर भरतो का?. यानंतर पुरुष वकील उत्तर देण्यापूर्वी, विरोधी वकील उत्तर देतात की ज्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे ती आयकरदाता आहे.
Another controversial video of Karnataka High Court judge who made 'Pakistan' comment surfaces
Justice Srishananda is seen reprimanding a woman lawyer for answering a question put to the counsel for the opposite party. pic.twitter.com/7KtWKnoCGD
— Bar and Bench (@barandbench) September 19, 2024
यानंतर न्यायमूर्ती महिला वकिलाला रोखतात आणि तुम्ही उत्तर का देत आहात असं विचारत फटकारतात. ते म्हणतात, "थांबा अम्मा." त्यानंतर त्या न्यायाधीशांची माफी मागतात. न्यायमूर्ती श्रीशानंद मग हसतात आणि कन्नडमध्ये म्हणतात, “तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व काही माहित आहे. उद्या विचारले तर तो कोणत्या रंगाचा अंडरगारमेंट घालतात ते सांगाल”.
न्यायमूर्ती श्रीशानंद यांनी केलेल्या या टिप्पणीनंतर त्यांच्यासमोर बसलेले वकिलही हसू लागतात. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी न्यायाधीशांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. न्यायाधीश श्रीशानंद यांना लिंग संवेदनशीलता काय आहे हे सांगितलं पाहिजे असं त्या म्हणाल्या आहेत. "आम्ही भारताच्या सरन्यायाधीशांना आवाहन करतो की त्यांनी या न्यायाधीशाविरुद्ध स्वतःहून कारवाई करावी आणि त्याला लैंगिक संवेदनशीलता प्रशिक्षणासाठी पाठवावे," अशी मागणी त्यांनी केली आहे.