नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने भारतामध्ये थैमान घातलं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ३ मेनंतर पुढची दिशा काय असणार? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी बोलतील.
कोरोनासंदर्भात सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची पंतप्रधानांची ही तिसरी वेळ असेल. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊनवरही समीक्षा केली जाणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये लॉकडाऊनवर नवीन निर्णय घेतला जाऊ शकतो, असं बोललं जातंय.
मागच्यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अडकेलेल्या परप्रांतीय मजूर आणि कामगारांसाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात यावी, अशी मागणी केली होती.
कोरोनामुळे मागच्या २४ तासात ५० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १,३८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात कोरोनाचे २०,४७१ रुग्ण आहेत. उपचारांनंतर बरे झालेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ३,९६० एवढी झाली आहे.
एकीकडे कोरोनाची ही लढाई सुरू असतानाच देशभरात डॉक्टर आणि रुग्णसेवा करणाऱ्यांवर हल्ले व्हायचे प्रकारही समोर आले आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. डॉक्टर आणि रुग्ण सेवा देणाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा आहे. या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.