अयोध्या : पंतप्रधान झाल्यानंतर बुधवारी नरेंद्र मोदी पहिल्यादांच अयोध्येत दाखल झाले. रामजन्मभूमीपासून २८ किलोमीटर अंतरावर त्यांची सभा आयोजित करण्यात आलीय. त्यांच्याआधी इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी हे दोघंच पंतप्रधानपदी असताना अयोध्येमध्ये गेले होते. फैजाबादचे भाजपा उमेदवार लल्लू सिंह आणि आंबेडकरनगरचे उमेदवार मुकुट बिहारी वर्मा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान सभा घेत आहेत. फैजाबादच्या गोसाईगंजच्या मया बाजार भागातील निवडणूक सभेला संबोधित करताना, बाबासाहेब आंबेडकर आणि राम मनोहर लोहिया यांचं नाव ज्या शहराशी जोडलंय त्या शहरात येऊन गौरवान्वित झाल्याचं वाटतंय, असं मोदींनी म्हटलं.
विरोधकांवर निशाणा साधताना, आमच्या देशातील ४० करोडहून जास्त श्रमिक भावा-बहिणींची या पक्षांनी कधीही पर्वा केली नाही. श्रमिक आणि गरिबांना केवळ वोटबँक बनवून या लोकांनी केवळ आपला आणि आपल्या कुटुंबाचा फायदा करून घेतला. पहिल्यांदाचा देशात एखाद्या सरकारनं गरिब आणि श्रमिकांबद्दल विचार केला... त्यांची काळजी घेतली... त्यांचं आयुष्य सुखकर बनवण्यासाठी प्रयत्न केले, असं म्हणत मोदींनी आपली पाठ थोपटून घेतली.
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी ४ हेलिपॅड नव्यानं तयार करण्यात आली आहेत. यापैकी ३ पंतप्रधानांच्या ताफ्यासाठी तर एक मुख्यमंत्री आदित्यनाथांच्या हेलिकॉप्टरसाठी असेल. पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
दरम्यान, अयोध्येमध्ये येऊनही मोदी रामलल्लाचं दर्शन घेणार नसल्याबद्दल मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राम मंदिर उभारण्याचं वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्ण केलं नाही. त्यामुळे राम मंदिर उभारण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय.