Bageshwar Dham : धक्कादायक! बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात पतीने नेले नाही म्हणून महिलेने स्वतःला संपवलं

Bageshwar Dham : याआधीही संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री चर्चेत आले होते. मीरा रोड येथे झालेल्या दिव्य दरबार कार्यक्रमातही मोठ्या संख्येने त्यांच्या भक्तांनी उपस्थिती लावली होती

Updated: Apr 1, 2023, 12:42 PM IST
Bageshwar Dham : धक्कादायक! बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात पतीने नेले नाही म्हणून महिलेने स्वतःला संपवलं

Bageshwar Dham : बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) हे नाव गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही धीरेंद्र शास्त्री यांचे अनेक भक्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या नावाची महाराष्ट्रात भरपूर चर्चा झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मीरा रोड (Mira Road) येथे धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार भरला होता. त्यालाही मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या भक्तांची संख्या मोठी असल्याचे पाहायला मिळत आहे. पण मध्य प्रदेशात बागेश्वर धाम याच्या भक्तीमुळे एका महिलेले स्वतःला संपवलं आहे.

महिलेला भक्ती ठरली जीवघेणी

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका महिलेसाठी बागेश्वर धामची भक्ती जीवघेणी ठरली आहे. मध्य प्रदेशच्या कांचनपूर परिसरात एका महिलेने आत्महत्या केली आहे. या महिलेच्या आत्महत्येचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. पतीने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात घेऊन ने गेल्याने पल्लवी चौधरी नावाच्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पल्लवी चौधरी यांना दोन लहान मुले देखील आहेत. पल्लवी यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा : Crime News : बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांची हातसफाई; मंगळसूत्रासह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

आज तकच्या वृत्तानुसार, पल्लवी या पती संदीप चौधरी, दोन मुले आणि सासूसोबत राहत होत्या. पल्लवी यांच्या वृद्ध सासू गंभीर आजार ग्रस्त आहेत. चौधरी कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली नाही. संदीप चौधरी हे कसेबसे आपले कुटुंब चालवत होते. पल्लवी चौधरी या दररोज बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन ऐकत होती. तसेच घरातील अडचणी दूर करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री जे काही सांगतात त्यावर विश्वास ठेवत होत्या.

पतीला यायला उशीर झाला म्हणून उचललं टोकाचं पाऊल

27 मार्च रोजी पल्लवी यांनी मला पनागर येथे होणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला जायचे आहे असे पतीला सांगितले होते. मात्र संदीप जौधरी आपल्या आजारी आईला घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन गेले. पण डॉक्टर न आल्याने त्यांना घरी यायला उशीर झाला. दुसरीकडे बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला घेऊन न गेल्याने पल्लवी चौधरी नाराज झाल्या होत्या. त्या संदीप चौधरी यांची वाट पाहत होत्या. पण पती न आल्याने पल्लवी यांनी घरातच गळफास घेत आत्महत्या केली.

यानंतर घरी परतलेल्या संदीप यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा न उघडल्याने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. पल्लवी यांचा लटकलेला मृतदेह पाहून संदीप यांना धक्काच बसला. यानंतर स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपास सुरु केला आहे.