Shocking News : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला मृत्यू कधी गाठेल याचा काही नेम नाही. हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांना अचानकपणे मृत्यूनं गाठलं आहे. मध्य प्रदेशातही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशात ट्रेनच्या जनरल बोगीतून प्रवास करताना थंडीमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय हे ट्रेनमधील कोणत्याच व्यक्तीला कळलं नाही. शेवटी ट्रेनने तब्बल 303 किमीचा प्रवास केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
हा सगळा धक्कादायक प्रकार कामायनी एक्स्प्रेसमध्ये घडला. कामायनी एक्स्प्रेसमध्ये हा तरुण सिंगल विंडो सीटवर बसून प्रवास करत होता. सोमवारी सकाळी मध्य प्रदेशातील दमोहला येणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात बैतूल येथील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. दमोह रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ट्रेन प्लॅटफॉर्म थांबवण्यात आली होती. सुमारे तासभरानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला.
रेल्वे पोलीस अधिकारी एएसआय महेश कोरी यांनी सांगितले की, चनेराकडे जाणारे तिकीट तरुणाच्या खिशात सापडले आहे. आणखी काही कागदपत्रेही सापडली असून त्यावरून मृत तरुण बैतूल येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. प्रचंड थंडीमुळे जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बैतूल येथील रहिवासी असलेला हा प्रवासी जनरल बोगीच्या सिंगल विंडो सीटवर बसला होता. प्रचंड थंडीमुळे या तरुणाचा सीटवर बसूनच मृत्यू झाला. मात्र शेजारी बसलेल्या इतर प्रवाशांच्या ते लक्षातही आले नाही. लोकांना वाटले की तो सीटवर बसून झोपला आहे. तोपर्यंत ट्रेनने सुमारे 303 किलोमीटरचे अंतर कापले होते. मात्र तो पर्यंत तरुणाचा मृतदेह सीटवरच पडून राहिला होता. इटारसीहून ट्रेन दमोहला पोहोचली तेव्हा तरुण कोणतीही हालचाल करत नसल्याचे लोकाच्या लक्षात आले. त्यावेळी तरुणाच्या एकाच कानात इअरफोन होता.
बऱ्याच वेळानंतर त्या बोगीत असलेल्या प्रवाशांना तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी रेल्वे नियंत्रण कक्षाला फोन करून त्याची माहिती दिली. त्यानंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता ट्रेन दमोह स्थानकात आल्यानंतर तरुणाचा मृतदेह रेल्वेतून बाहेर काढण्यात आला. डॉक्टरांनी तपासणी केली असता थंडीमुळे आलेल्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. यानंतर रेल्वे पोलिसांना त्याच्याजवळ सापडलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून कुटुंबीयांना मृत्यूची माहिती दिली. महत्त्वाची बाब म्हणजे मृत तरुण एका एसी कंपनीत कामाला होता आणि त्यासाठी तो तिथे गेला होता. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्याचे कुटुंबीयांशीही बोलणे झाले होते. मात्र त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.