नवी दिल्ली: येत्या १९ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. एक राष्ट्र, एक निवडणूक ही संकल्पना या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांसमोर मांडली जाईल अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांच्या अध्यक्षांना या बैठकीला आमंत्रण पाठवले आहे. एक राष्ट्र, एक निवडणूक यासोबतच २०२२ मध्ये स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठीही या बैठकीत चर्चा शक्य आहे. त्यानंतर २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांसोबत चर्चा करणार आहेत. मोदी सरकार पहिल्यापासूनच एक राष्ट्र एक निवडणूक मुद्दावर आग्रही आहे. आता याच्या अंमलबजाणीसाठी मोदींनी बैठक बोलविली आहे.
संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्रातील पहिले लोकसभा अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. १७ व्या लोकसभेत अनेक नवे चेहरे दिसणार असून, केंद्रीय अर्थसंकल्प, तीन तलाक विधेयक असे महत्त्वाचे विषय पटलावर मांडले जाणार आहेत. या संसदीय अधिवेशनात १० विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय, पाच जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाचे पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाणार आहे. १९ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील. २६ जुलै रोजी लोकसभा अधिवेशनाची सांगता होणार आहे.