श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या भाजपच्या आश्वासनानंतर मेहबुबा मुफ्ती सातत्याने मोदी सरकारवर आगपाखड करत आहेत. यावेळीही मेहबुबा मुफ्ती यांनी मोदींवर टीका करण्याच्या नादात पाकिस्तानची बाजू उचलून धरली आहे. नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या सभेत वेळ पडल्यास पाकिस्तानविरुद्ध अणवस्त्रांचा वापर करू, असे म्हटले होते. त्यावर मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानकडे जी अण्वस्त्रे आहेत ती सुद्धा त्यांनी ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
If India hasn’t kept nuclear bomb for Diwali, it’s obvious Pakistan’s not kept theirs for Eid either. Don’t know why PM Modi must stoop so low & reduce political discourse to this.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) April 22, 2019
मोदी यांनी पाटण येथील सभेत म्हटले होते की, पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले तेव्हा मी पाकिस्तानला इशारा दिला होता. जर अभिनंदन यांना काही झाले तर तुम्हाला सोडणार नाही, असे मी ठणकावून सांगितले होते. जर त्यावेळी पाकिस्तानने अभिनंदन यांना सोडले नसते तर ती रक्तपाताची रात्र ठरली असती. मी मनाशी ठरवलेच होते की, एकतर ते जिवंत राहतील नाहीतर दहशतवादी जिवंत राहतील. हा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता, असे मोदींनी सांगितले होते.
भारतीय वायूदलाच्या बालाकोट एअर स्ट्राईक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकच्या हद्दीत कोसळले होते. विमान कोसळण्यापूर्वी अभिनंदन यांनी पाकचे एफ-१६ हे अत्याधुनिक विमान पाडले होते. मात्र, या सगळ्यात त्यांचे मिग-२१ विमानही कोसळले. त्यावेळी अभिनंदन पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून बाहेर पडले. दुर्दैवाने ते पाकिस्तानमध्ये उतरले. यानंतर त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले होते.