इस्लामाबाद : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. भारताकडून पाकिस्तानची विविध मार्गाने कोंडी केली जात आहे. भारताकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये स्पेशल सेलची स्थापना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
परदेश मंत्रालयाचे प्रवक्ता मुहम्मद फैसल यांनी 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'ला दिलेल्या माहितीनुसार, स्पेशल सेल सीमेवरील परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे. परदेश मंत्रालयाकडून या स्पेशल सेलची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण आठवडाभर हे काम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावपूर्ण संबंधांवर अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर संपुष्टात यावी असे ट्रम्प यांनी सांगितले.
भारताने ४० जवान गमावले असल्याचे मी समजू शकतो. मोठ्या संख्येने याबाबत चर्चा सुरू आहे. याप्रकरणी भारत मोठी, शक्तीशाली पाऊले उचलण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या समस्या वाढल्या आहेत. पाकिस्तानला अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या १.३ अब्ज डॉलरची मदत बंद करण्यात आली आहे. याबाबत अमेरिका पाकिस्तानसोबत बैठक करणार असून पाकिस्तानने अमेरिकेचा फायदा घेतला असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.