नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणा-यांची संख्याही वाढते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
सोनं खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात यावं असा प्रस्ताव अर्थ नियामकांच्या एका समितीने सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सोन्याच्या सर्व व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात येऊ शकतं.
सध्याच्या नियमांनुसार दोन लाखांहून अधिक रुपयांचं सोनं खरेदी केल्यास पॅन कार्ड सादर करणं आवश्यक आहे. मात्र, हा नवा प्रस्ताव लागू झाल्यास कितीही किंमतीचं सोनं खरेदी केलं तर पॅन कार्ड द्यावे लागणार आहे.
इलेक्ट्रॉनिक गोल्ड रजिस्ट्रेशन
सोनं खरेदीच्या व्यवहारांची संगणकीय नोंद करण्यात यावी असाही प्रस्ताव आहे. म्हणजेच तुम्ही ज्वेलर्सकडून सोनं खरेदी केल्यास त्याची माहिती ऑनलाईन नोंद करण्यात येईल. त्यामुळे कुठल्या व्यक्तीने किती सोनं खरेदी केलं आहे याची माहिती राहील. तसेच काळ्या पैशांच्या माध्यमातून सोनं खरेदी केलं आहे की नाही हे सुद्धा कळेल.