देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मोदींकडून २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Updated: May 12, 2020, 10:44 PM IST
देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मोदींकडून २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा title=

नवी दिल्ली: कोरोनाचे संकट सरल्यानंतर भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तब्बल २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजच्या माध्यमातून देशाच्या जीडीपीच्या १० टक्के आर्थिक मदत केली जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था, मजूर, लघूमध्यम उद्योग अशा सर्वांना मदत केली जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबद्दल सविस्तर माहिती देतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारताने कोरोनाच्या संकटाचे संधीत रुपांतर करायला पाहिजे. तरच २१ व्या शतकावर वर्चस्व ठेवण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यासाठी भारताला स्वयंपूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे भारताने एखादी गोष्ट ठरवली तर काहीच अवघड नाही. आगामी काळात आपल्याला अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, सक्षम व्यवस्था, वैविध्यपूर्ण लोकसंख्याशास्त्र (डेमोग्राफी) आणि मागणी पुरवठ्याच्या चक्राचे सुयोग्य नियोजन या पाच प्रमुख घटकांच्या पायावर देशाची भक्कम इमारत उभारावी लागेल, असे मोदींनी यावेळी सांगितले. त्यासाठी देशातील जनतेने आपला मोर्चा 'ग्लोबल'कडून लोकल उत्पादनांकडे वळवाला. स्थानिक उत्पादनांची केवळ खरेदीच नव्हे तर त्यांचा प्रचारही करा. जेणेकरून स्थानिक उत्पादनांना सुगीचे दिवस येतील, असेही मोदींनी यावेळी म्हटले.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात देशाला स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने भारतीयांनी विचार करायला सुरुवात करावी, या मुद्द्यावर विशेष भर दिला. कोरोनाच्या संकटामुळे जागतिक व्यवस्थेतील कच्चे दुवे उघडे पडले आहेत. या काळात आपल्याला स्थानिक स्रोतच अधिक कामाला आले, याकडे मोदींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटापूर्वी भारतात पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे नाममात्र उत्पादन केले जायचे. मात्र, सध्या भारतामध्ये प्रत्येक दिवशी जवळपास दोन लाख पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे उत्पादन होते. भारताने संकटाचे संधीत रुपांतर केल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मोदींनी सांगितले.  

जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. त्यामुळे भारताने स्वयंपूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्याला भारतीय संस्कृती आणि संस्कारांना अनुसरून सर्वव्यापी विकास करायचा आहे. आपली स्वयंपूर्णता ही आत्मकेंद्री नसेल. भारताच्या स्वयंपूर्णतेत जगाचे सुख, शांती आणि कल्याण अभिप्रेत असेल, असे मोदींनी म्हटले. 

 

तसेच कोरोना व्हायरस हा दीर्घकाळ आपल्यासोबत राहणार आहे. मात्र, आपल्याला कोरोनाशी लढण्यातच गुंतून राहता येणार नाही. त्यासाठी आपण लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा अत्यंत नव्या स्वरुपाचा आणि नियमांचा असेल. राज्यांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे याची आखणी केली जाईल आणि १८ मे पूर्वी नागरिकांना याबाबत सूचित केले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.