PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी रात्री अमेरिका (US) आणि इजिप्त (Egypt) दौरा संपवून भारतात परतले आहेत. नरेंद्र मोदी सहा दिवसांनी स्वदेशी परतले असून दिल्लीच्या पालम विमानतळावर रात्री 12.30 वाजता त्यांचं विमान लँड झालं. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांच्यासह दिल्लीतील सर्व भाजपा खासदारांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांची विचारणा केली तसंच रात्री झोपायचं सोडून विमानतळावर कशाला आलात? अशी विचारणा केल्याचं भाजपा नेत्यांनी सांगितलं. तसंच मोदींनी यावेळी देशात सध्या काय सुरु आहे अशी विचारणा केली. जे पी नड्डा यांनी यावेळी केंद्र सरकारला 9 वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सुरु कार्यक्रमांची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. हा दौरा संपल्यानंतर ते दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यासाठी दाखल झाले होते. हे दौरे संपल्यानंतर सहा दिवसांनी नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. भाजपाने अमेरिका आणि इजिप्त दौरा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदींनी अनेक व्यावसायिक करार केले. तेथील उद्योगपतींची भेट घेतली आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नरेंद्र मोदी येथे स्टेट गेस्ट म्हणून पोहोचले होते. अमेरिकेत नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ व्हाइट हाऊसमध्ये स्टेट डिनर आणि स्टेट लंचचं भव्य नियोजन करण्यात आलं होतं.
#WATCH | Prime Minister Narendra Modi returns to Delhi after concluding his state visits to US and Egypt, received by BJP chief JP Nadda and other party leaders pic.twitter.com/H0FsEyzRqz
— ANI (@ANI) June 25, 2023
दिल्ली विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, वीरेंद्र सचदेवा, खासदार हर्षवर्धन, हंसराज हंस, मनोज तिवारी, गौतम गंभीर, परवेश शर्मा उपस्थित होते.
भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी सांगितलं की, "पंतप्रधान मोदींनी जे पी नड्डा यांना देशात काय सुरु आहे अशी विचारणा केली. त्यावर नड्डा यांनी सांगितलं की, पक्षाचे नेते केंद्र सरकारला 9 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेमध्ये जात आहेत आणि देश आनंदी आहे". भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी सांगितलं की, पंतप्रधानांनी देशात काय सुरु आहे, तसंच पक्षाचा जनसंपर्क कार्यक्रम कसा सुरु आहे अशी विचारणा केली. यानंतर आम्ही त्यांना त्याबद्दल माहिती दिली.
भाजपा खासदार हंसराज हंस यांनी नरेंद्र मोदींचं स्वागत केल्यानंतर मीडियासमोर गाणं गाऊन दाखवलं. यावेळी त्यांनी विरोधकांच्या बैठकीवरही टीका केली. विरोधकांना जे हवं, ते करु द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा सर्वांना अभिमान वाटायला हवा. अमेरिकी संसदेत पंतप्रधान मोदींचा झालेला सन्मान याआधी कोणीच पाहिला नव्हता असंही ते म्हणाले.