मोदींनी चोरीची कबुली दिलीय; राहुल गांधींची पुन्हा घणाघाती टीका

वायुसेनेला अंधारात ठेवून राफेल कराराच्या अटी बदलण्यात आल्या.

Updated: Nov 13, 2018, 03:55 PM IST
मोदींनी चोरीची कबुली दिलीय; राहुल गांधींची पुन्हा घणाघाती टीका title=

नवी दिल्ली: केंद्र सरकारने राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या खरेदी प्रक्रियेचा तपशील असणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. 

केंद्र सरकारचे प्रतिज्ञापत्र म्हणजे मोदींनी स्वत:हून दिलेली चोरीची कबुली आहे. पण, पिक्चर अजून बाकी आहे, असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वायुसेनेला अंधारात ठेवून राफेल कराराच्या अटी बदलण्यात आल्या. त्यामुळे अंबानींना ३० हजार कोटींचा फायदा झाला, असा आरोपही राहुल यांनी केला. 

तत्पूर्वी केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात राफेल विमान खरेदीची कागदपत्रे सादर केली. 

या कागदपत्रांमध्ये राफेल विमान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया कशाप्रकारे पार पडली, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हा व्यवहार होण्यापूर्वी भारत आणि फ्रान्स यांच्यात तब्बल वर्षभर वाटाघाटी सुरु होत्या. 

संरक्षण सामुग्री खरेदी करतानाचे सर्व नियम यावेळी पाळण्यात आले होते. कॅबिनेटच्या संरक्षण विषयक समिती (CCA)ने मंजुरी दिल्यानंतरच सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली, असे सरकारने कागदपत्रांमध्ये स्पष्ट केले आहे.