Petrol-Diesel Price Cuts : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार आता मोठी पाऊलं उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी योजना आखली जात आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांचा खिशा जड होण्याची शक्यता आहे. 22 मे 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता नववर्षाला गोड बातमी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम मंत्रालयाने पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामध्ये दोन्ही इंधनांमध्ये प्रतिलिटर 8 ते 10 रुपयांची कपात करण्यात आली असून, तो लवकरच मंजूर होऊ शकतो. पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी मिळणं बाकी आहे. आयात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.
सरकारी तेल कंपन्यांची आर्थिक स्थिती चांगलीच असल्याने असा निर्णय घेतला जाऊ शकतो. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांच्या नफ्यात देखील मागील काही दिवसात वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना मोदी सरकार जनतेला दिलासा देऊ शकतं.
कसे आहेत सध्याचे दर?
दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर