विरोधकांनी संख्याबळाची चिंता सोडून द्यावी- नरेंद्र मोदी

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिले संसदीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले.

Updated: Jun 17, 2019, 03:04 PM IST
विरोधकांनी संख्याबळाची चिंता सोडून द्यावी- नरेंद्र मोदी title=

नवी दिल्ली: समर्थ विरोधी पक्ष असणे ही लोकशाहीची अनिवार्य अट आहे. त्यामुळे विरोधकांनी संख्याबळाची चिंता सोडून अधिवेशनात जनकल्याणासाठी काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिले संसदीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. लोकसभा सभागृहात जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी त्यांनी म्हटले की, जनतेने विरोधी पक्षांना कोणताही कौल दिलेला असो. मात्र, विरोधकांची भावना आणि त्यांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मौल्यवान आहे. सभागृहात खासदार म्हणून बसल्यावर विरोधी पक्षापेक्षा निष्पक्षतेची भावना गरजेची आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी विभागणी करण्यापेक्षा निस्पृह भावनेने जनकल्याणाला प्राधान्य द्यावे. जेणेकरून येत्या पाच वर्षांमध्ये आपण संसदेची प्रतिष्ठा वाढवू, असे मोदींनी सांगितले. 

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; १९ जूनला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

१७ व्या लोकसभा अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. १९ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील. तीन तलाक विधेयकावरही नजर असणार असून, २६ जुलैपर्यंत अधिवेशन चालणार आहे.