पाकिस्तानात कार्यक्रम, तर मी देशाची माफी मागतो : मिका सिंग

 तर मी फेडरेशन आणि देशाची माफी मागतो असेही मिका म्हणाला. 

Updated: Aug 21, 2019, 09:18 PM IST
पाकिस्तानात कार्यक्रम, तर मी देशाची माफी मागतो : मिका सिंग title=

मुंबई : पाकिस्तानमध्ये जाऊन कार्यक्रम केल्याबद्दल सर्व स्तरातून टीका झाल्यावर गायक मिका सिंग याने स्पष्टीकरण दिले आहे. मी तिथे माझ्या हट्टापायी गेलो नव्हतो, तर मी तिथे कार्यक्रम केला आणि इथे भारतात अनुच्छेद ३७० रद्द झाले. हा एक योगायोग होता. पण जर माझी चूक झाली असेल तर मी फेडरेशन आणि देशाची माफी मागतो असेही मिका म्हणाला. 

८ ऑगस्टला पाकिस्तानमधील कराची येथे मिका सिंग याचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम आता वादात सापडला आहे. पॉप गायक मिका सिंग याच्या कार्यक्रमाच्यावेळी आयएसआयचे अनेक अधिकारी आणि डॉन दाऊद इब्राहिम यांचे नातेवाईक अतिथींमध्ये उपस्थित होते.

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या जवळच्या नातलगाने ८ ऑगस्ट रोजी कार्यक्रम आयोजित केला होता. यात मिका याने परफॉर्मन्स सादर केला होता. त्यानंतर अखिल भारतीय सिने कामगार संघटनेने (एआयसीडब्ल्यूए) त्याच्यावर बंदी घातली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मिकाच्या कार्यक्रमात दाऊदचे नातेवाईक होते, अशी भारतीय गुप्तचर विभागाची माहिती आहे. 

मुशर्रफचा चुलत भाऊ अदनान असद यांनी आपल्या मुलीच्या लग्नातील एका समारंभासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कराचीच्या डिफेन्स हाऊसिंग कॉलनी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथून दाऊदची अनीस इब्राहिम आणि जवळचा सहकारी छोटा शकील यांचे घर जवळ आहे.

दरम्यान, अदनान असद हे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे असू शकतात आणि म्हणूनच ते मिका आणि त्याच्या १४ क्रू सदस्यांसाठी व्हिसाची व्यवस्था करू शकले, असेही वृत्त आहे. सूत्रांनी सांगितले की ८ ऑगस्टच्या कार्यक्रमापूर्वी मिका लाहोरमध्ये होता. तेथे तो एका उच्च सरकारी अधिकाऱ्याला भेटल्याची माहिती आहे.