नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या गुरमीत राम रहीम याच्या समर्थकाने जेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील अंबाला येथील जेलमध्ये अटक करण्यात आलेल्या डेरा समर्थक रविंद्र कुमार याने आत्महत्या केली आहे. २७ वर्षीय रविंद्रने फाशी घेत आत्महत्या केलीय.
२५ ऑगस्ट रोजी सीबीआय न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं. त्यानंतर राम रहीमच्या समर्थकांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली.
हरियाणा, पंजाब, दिल्ली-एनसीआर आणि जम्मूमधील काही परिसरात हिंसा सुरु झाली होती. अनेक वाहनंही पेटवून दिली. या हिंसेत जवळपास ३८ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, ३०० हून अधिकजण जखमी झाले.
हिंसा आणि जाळपोळ करणा-या राम रहीमच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी रविंद्र एक होता. रविंद्र कुमार याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.