G-20 परिषदेत अमेरिकेने त्रुटी शोधून दाखवल्याने भडकला रशिया; भारताच्या बाजूने दिलं जोरदार प्रत्युत्तर

G20 Summit : दिल्लीत सुरु असलेल्या दोन दिवसीय जी-20 समूहाच्या शिखर बैठकीकडे जगभराचं लक्ष्य लागलं आहे. त्यामुळे जगभरातील माध्यमे याचे वार्तांकन करत आहेत. अशातच काही माध्यमांनी टीका केल्याने रशियाने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 9, 2023, 02:24 PM IST
G-20 परिषदेत अमेरिकेने त्रुटी शोधून दाखवल्याने भडकला रशिया; भारताच्या बाजूने दिलं जोरदार प्रत्युत्तर title=
(फोटो सौजन्य - AP)

G20 Summit Delhi 2023 : जी-20 समूहाच्या (G20 Summit) दोन दिवसांच्या परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली (Delhi) येथे जी-20 देशांसह अनेक निमंत्रित देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधींची शिखर परिषद पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) भारत मंडपममध्ये सर्व देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले आहे. याचे जगभरातून कौतुक होत असताना काही पाश्चात्य देशांची प्रसारमाध्यमे भारताच्या आदरातिथ्यात त्रुटी शोधण्यात व्यस्त आहेत. मात्र रशियन मीडियाने याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रशिया टीव्हीने (Russia TV) पाश्चात्य देशांच्या भूमिकेबद्दल त्यांना फटकारले आहे.

रशिया टीव्हीच्या वृत्तानुसार, पाश्चात्य मीडिया आणि पत्रकारांनी त्यांच्या रिपोर्ट्समध्ये जी-20 शिखर परिषदेच्या तयारीसाठी भारतीय अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी कशी हटवली हे दाखवले आहे. जी-20 शिखर परिषदेसाठी हे सगळं करण्यात आले. त्यावर रशिया टीव्हीच्या संपादकीयमध्ये पाश्चिमात्य देशांना आरसा दाखवण्यात आला आहे.

"पाश्चात्य देशांमध्ये उत्पन्नाची असमानता विक्रमी पातळीवर आहे. या प्रकारच्या टाइपकास्टिंगला अधिक क्लिक मिळतात. एवढेच नाही तर वसाहतवादी मानसिकतेने त्याची रचना करण्यात आली आहे. ब्रिटनसारख्या देशांनी ही चूक करणे स्वाभाविक आहे, पण अमेरिका असे का करत आहे? त्यांनी भूतकाळात ब्रिटीश वसाहतवादाविरुद्ध लढा दिला होता. अमेरिका या वर्षी मुनरो सिद्धांताची 200 वर्षे साजरी करत आहेत. भारतीय पत्रकारांनी झोपडपट्टीतील रहिवासी आणि भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी ही सगळी व्यवस्था केल्याचे म्हटलं आहे. यासोबत इथे पारंपारिक भारतीय कलेसह सर्व काही भारतीयांचे प्रदर्शन केले जाईल याची खात्री केली गेली आहे. जी20 शिखर परिषदेच्या तयारीसाठी सरकारचे प्रतिस्पर्धी आम आदमी पार्टीकडूनही कौतुक केले आहे," असे या संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

रशिया टीव्हीने आपल्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, पाश्चात्य देशांना आर्थिक वर्चस्व गमावण्याचा धोका आहे. शीतयुद्धाच्या समाप्तीपासून, अमेरिका-केंद्रित जागतिक व्यवस्थेपासून दूर जाण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पाश्चात्य देशांच्या मनमानी निर्बंधांमुळे इतर देशही संतप्त झाले आहेत.

अमेरिकन पत्रकारांनी व्यक्त केली नाराजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.  बायडेन भारतात आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र त्यानंतर होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेसाठी करणार अमेरिकी पत्रकारांना मर्यादित प्रवेश मिळणार आहे. त्यावरून संतापलेल्या या पत्रकारांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान आणि व्हाइट हाउसचे प्रेस सेक्रेटरी केरीन जीन-पियरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती.