संभल हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी जामा मशिदीतील सर्व्हे आणि त्यासंदर्भात हिंसेमुळे संभल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या दरम्यान अतिशय धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. शनिवारी 14 डिसेंबर रोजी जेव्हा प्रशासनाने वीज चोरीबाबत चेकिंग केली तेव्हा अधिकाऱ्यांना धक्कादायक बाब दिसली. या ठिकाणी 100 वर्षांहून जुनं शिव मंदिर सापडलं आहे.
मंदिराची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यावेळी अधिकारी देखील पोहोचले त्यांनी मंदिराची आणि त्यामध्ये असलेल्या मंदिराची साफसफाई केली. तसेच पूजा विधी करुन आरती देखील कऱण्यात आली. या मंदिरात शिवलिंग, भगवान हनुमान आणि नंदी यांची मूर्ती सापडली आहे.
मंदिर सापडल्यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले. इतक्या वर्षांपासून मंदिर बंद का आहे? हे मंदिर उघडलं का नाही? या मंदिराला कुलूपं का लावण्यात आली. चौकशीनंतर असे कळले की, हे मंदिर गेल्या 46 वर्षांपासून बंद आहे. या मंदिराला टाळं लागण्याच कारण म्हणजे 1978 साली झालेला सांप्रदायिक वाद.
संभलच्या ज्या भागात हे मंदिर सापडले, तेथे पूर्वी 42 हिंदू कुटुंबे राहत होती. 1978 मध्ये दंगली झाल्या आणि त्यानंतर हळूहळू हिंदू कुटुंबे या भागातून स्थलांतरित झाली. आता अतिक्रमणधारकांनी मंदिराच्या माथ्यावरील बाल्कनी हटवल्या आहेत. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरही अतिक्रमण झाले आहे. मंदिरात शिवलिंगाशिवाय हनुमानजींची मूर्ती सापडली आहे. याशिवाय येथे एक प्राचीन विहीर सापडली असून, उत्खननादरम्यान आणखी तीन मूर्ती सापडल्या आहेत.
संभलच्या खग्गु सराई भागातील हे कार्तिक शंकर मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 300 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. हा भाग पूर्वी हिंदूबहुल होता. कार्तिक शंकर मंदिर हे येथील हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र होते. मात्र 1978 च्या दंगलीनंतर हिंदू कुटुंबाने येथे पूजा करणे बंद केले.
हिंदूंच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधले होते. जवळच एक पिंपळाचे झाड होते आणि तिथे एक विहीर देखील होती. लोक सकाळ संध्याकाळ मंदिरात दर्शनासाठी येत असत आणि विहिरीजवळ कीर्तन होत असे. 1978 मध्ये येथे दंगल झाली आणि हिंदूंनी येथून पळ काढला. आजूबाजूला मुस्लीम लोकसंख्या होती, त्यामुळे घाबरून ते तिथून निघून गेले.
या भागात 40 ते 42 हिंदू कुटुंबे राहत होती आणि मुस्लिम कुटुंबे थोड्या अंतरावर राहत होती. सगळ्यांमध्ये खूप भाऊबंदकी होती. मंदिरात सर्व धार्मिक परंपरा झाल्या. 2005 मध्ये येथील शेवटचे घर विकले गेले.
मंदिरात पूजा आणि आरती करण्यासाठी कोणीही शिल्लक नव्हते. शेवटचे हिंदूघरही एका मुस्लिम कुटुंबाला विकले. मंदिराच्या माथ्यावर लोकांनी बाल्कनी काढली होती. मंदिराभोवती 4 फूट प्रदक्षिणा मार्ग होता, मात्र समोरचा भाग वगळता तिन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले होते.