तीराला मिळणार इंजेक्शन, पंतप्रधान मोदींकडून 6 कोटींचा कर माफ

मृत्यूशी झुंज देणाऱ्या तिराला जीवदान, अमेरिकेतून येणाऱ्या इंजेक्शनवर कर माफ

Updated: Feb 10, 2021, 12:51 PM IST
तीराला मिळणार इंजेक्शन, पंतप्रधान मोदींकडून 6 कोटींचा कर माफ title=

मुंबई: रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या 5 महिन्यांच्या तीराच्या उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वात मोठा अडथळा असलेला कर देखील आता माफ करण्यात आला आहे. त्यामुळे तीरावर आता उपचार होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीरा कामतच्या उपचारासाठी 6 कोटी रुपयांची करमाफी दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. त्यांच्या पत्राची दखल घेत सूत्रं हलवली. अवघ्या 5 महिन्यांच्या तीरा कामत या चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तीराला अत्यंत दुर्धर आजारानं ग्रासलं आहे.

या आजारावर जे इंजेक्शन आवश्यक आहेत. ते उपलब्ध करण्यासाठी 16 कोटींची अवश्यकता होती. कामत कुटुंबियांना लोकसहभागातून 16 कोटी रुपयांची मदत मिळाली. पण त्यातही एक अडचण उभी राहिली. अमेरिकेतून औषध मागवायचं असल्यानं त्यावर कर लागत होता. 6 कोटी रुपयांचा तब्बल कर लागत असल्यानं हा कर माफ करावा यासाठी कामत कुटुंबीय आणि काही कलाकारांनी देखील प्रयत्न केले. अमेरिकेतून आयात करावयाच्या औषधांवर सहा कोटी कर रकमेची तजवीज कशी करावी, अशी भ्रांत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राची पंतप्रधानांनी तत्काळ दखल घेत पूर्ण करमाफी दिली.

मुंबईतील रुग्णालयात तीरा कामतवर उपचार सुरू आहेत. तीरा एसएमए टाइप 1 आजाराशी झगडत आहे. तज्ज्ञांच्या मते या आजारामुळे मुलीचे आयुष्य केवळ 18 महिन्यांपर्यंत असू शकते. या चिमुकलीला वाचवण्यासाठी अमेरिकेतील हे इंजेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे इंजेक्शन लवकरात लवकर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारकडून देखील कामत कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिल्यानंतर त्याची दखल घेत पंतप्रधान मोदींनी तिरासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शनवरील कर माफ केला आहे. त्यामुळे तिराला आता हे इंजेक्शन लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकेल.