ओमायक्रॉनने वाढवल्या चिंता, या महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?

भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे याआधीच यावर योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना तज्ज्ञांनी दिल्या आहेत.

Updated: Dec 7, 2021, 04:22 PM IST
ओमायक्रॉनने वाढवल्या चिंता, या महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?

मुंबई : कोरोनाचा (Corona) नवीन प्रकार ओमायक्रॉन (Omicron) हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण ठरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तिसरी लाट शिगेला पोहोचेल. या काळात भारतात दररोज एक ते दीड लाख लोकांना संसर्ग होणार असा दावा आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल (Manindra Agrawal) यांनी त्यांच्या गणितीय मॉडेलच्या आधारे केलाय.

मनिंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या अभ्यासात दावा केला आहे की, ओमायक्रॉन प्रकारामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) जानेवारीमध्ये सुरू होईल आणि फेब्रुवारीपर्यंत ती शिखरावर पोहोचेल. जरी त्यांनी असा दावा केला असला तरी त्याचा संसर्ग खूप सौम्य असेल. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. पद्मश्री प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनीही त्यांच्या गणनेतून कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अंदाज लावला होता. तो बरोबर सिद्ध झाला. 

सध्या ते आयआयटी कानपूर येथे कॉम्प्युटर सायन्स विभागात प्राध्यापक आहेत. ज्या गणितीय मॉडेलच्या आधारे त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला होता, त्याच मॉडेलच्या आधारे त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, तिसरी लाट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि फेब्रुवारीपर्यंत ती शिगेला पोहोचेल.

लॉकडाउन किंवा रात्रीचा कर्फ्यू लागू करावा लागणार

आयआयटी कानपूरचे तज्ज्ञ मनिंद्र अग्रवाल यांचा दावा आहे की, ओमायक्रॉन हा सौम्य प्रभावाचा प्रकार आहे आणि फारसा प्राणघातक नाही, तरीही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ते असेही म्हणाले की, जेव्हा संसर्ग शिखरावर असते तेव्हा तो नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन किंवा रात्री कर्फ्यू सारखी व्यवस्था करावी लागेल. ज्यांना एकदाच कोरोना झाला आहे, त्यांनी जास्त घाबरण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. यामुळे त्यांना संसर्ग कमी होईल.

कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी धोकादायक नाही

प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल सांगतात की, एकदा कोरोना झालेल्या लोकांमध्ये चांगली नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. ओमायक्रॉन प्रकारामुळे येणारी कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी धोकादायक नसेल. Omicron प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा सौम्य आहे. डेल्टा प्रकाराच्या तुलनेत ओमायक्रॉन संसर्ग दर एक तृतीयांश असेल. यावर उपाय म्हणून त्यांनी सांगितले की सामूहिक लसीकरणामुळे तिसरी लाट कमकुवत होईल. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झालेले नाही, त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

मुलांवर घातक परिणाम होण्याची भीती निराधार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. 'संसर्ग रोखण्यात मुलांची प्रतिकारशक्ती यशस्वी होईल. तसेच ज्या लोकांना कोरोना झाला आहे किंवा ज्यांनी लसीकरण केले आहे. त्यांना धोका कमी राहिल. पण लोकांनी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग राखणे महत्त्वाचे आहे.'