उद्धव ठाकरेंचे अनंत गिते यांना उपोषण मंच सोडण्याचे आदेश

शिवसेना खासदार अनंत गिते यांना उद्धव ठाकरेंचा एक फोन आला आणि त्यांना अखेर...

Updated: Apr 12, 2018, 01:28 PM IST

नवी दिल्ली : भाजपचे खासदारांना पंतप्रधान मोदींनी केलेलं उपोषणाचं आवाहन शिर्सावंद्य असणे स्वाभाविक आहे. पण ते आवाहन शिवसेनेच्या मंत्र्यांना खासदारांनाही शिर्सावंद्य वाटणं एकूणच शिवसेनेच्या राजकीय उपमर्दच म्हणावा लागेल. आणि हाच उपमर्द केला आहे. केंद्रीय मंत्री अनंत गिते भाजपच्या करोल बागच्या उपोषणात सहभागी झाले आणि एकच खळबळ उडाली. उपोषणाच्या मंचावर शिवसेनेचे खासदार अनंत गिते अवतरल्याचं पाहून थेट, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अनंत गिते यांना फोन करून तातडीनं मंचावरून उठण्याचे आदेश दिले. 

शिवसेनेची राजकीय भंबेरी

मुंबईतून पक्षप्रमुखांचं फर्मान आल्यावर गिते मंचावरून निघून गेले. पण त्याआधी अनंत गिते यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश आहेत. त्यामुळे त्याचे पालन करत असल्याचं अनंत गिते म्हणाले. एका बाजूला टोकाचा विरोध करून सरकारवर घणाघाती टीका करणारे उद्धव ठाकरे आणि सामना आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्र्यांचं भाजपच्या मंचावर रमणं यामुळे शिवसेनेची चांगलीच राजकीय भंबेरी उडाली हे मात्र नक्की.