Inflation likely to rise in India : देशात अनेक राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊन महागाईचा भडका उडेल अशी शक्यता आहे. आवक कमी झाल्यास धान्यांच्या किंमती कडाडतील. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार या राज्यांना अवकाळीचा तडाखा बसला आहे.
याआधी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने ऊस, कांदा, कापसाचंही नुकसान झालंय. त्याचा परिणाम आता दिसत आहे. या पिकांचं उत्पादन घटून आवक कमी झालीय. आता झालेल्या पावसामुळे कांद्याचं उत्पादन 25 ते 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील लासलगावातल्या उन्हाळी कांद्याचं मोठं नुकसान झाले आहे. रात्री गारपीट आणि वादळामुळे कांदा जमीनदोस्त झालाय. लाल कांदा 500 ते हजार रुपये तोट्यात विकल्यानंतर या उन्हाळी कांद्याकडे शेतकरी आशा लावून होता. मात्र आता हा कांदाही भुईसपाट झालाय. हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं कांदा उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे.
दरम्यान, पुढचे पाच दिवस राज्यात गारपीट आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस कोसळेल असा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट होण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि विदर्भात 2 ते 3 दिवस पावसाची थोडीसी उघडीप राहील. कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 16 एप्रिलनंतर राज्यात पाऊस थांबणार असल्याचे हवामान विभागानं म्हटले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागाला महिनाभरात तिस-यांदा अवकाळी पावसानं झोडपलंय. पहादरा, धामणी परिसरात सर्वाधिक फटका बसलाय. मक्याचं उभं पीक जमीनदोस्त झाल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय.
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातल्या टाकळी विंचूर इथं झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या आहेत. द्राक्षाचं पीक जोमदार आलं होतं. मात्र गारपिटीनं होत्याचं नव्हतं केलं. शेतक-यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. घेतलेलं कर्ज कसं फेडावं हा प्रश्न बळीराजासमोर आहे. सरकारनं तातडीनं मदत करावी असं आवाहन शेतकरी करत आहे.
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. हरसूल-पेठ रस्त्यावरील सारस्ते, कुळवंडी, घनशेत, खरपडी या गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलाय. वादळी पावसात आदिवासींच्या घरांचं मोठं नुकसान झालंय. घरांची छतं उडाल्यानं घरात पाणी शिरलंय. 90 टक्के घरांची पडझड झालीय. तर शेतीचंही मोठं नुकसान झालंय. गारपिटीचा आंब्याला फटका बसलाय. तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केलीय.
दरम्यान, अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार गेले होते. त्यांच्या दौऱ्यावर टीका होत आहे. राज्यात शेतकरी अडचणीत असताना अयोध्या दौरा केल्याने ही टीका करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री स्वतः पाहणी करत असतानाच सर्व मंत्री आणि पालकमंत्र्यांनीही आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात, मतदारसंघात जाऊन पाहणी करावी असे आदेश देण्यात आलेत. शेतीच्या बांधावर जाऊन शेतक-यांशी चर्चा करा, धीर द्या असे आदेश जारी करण्यात आलेत.