घाम गाळून महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा राज्य सरकारकडून छळ- योगी आदित्यनाथ

मजुरांना वाऱ्यावर सोडून देत.... 

Updated: May 25, 2020, 06:35 AM IST
घाम गाळून महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा राज्य सरकारकडून छळ- योगी आदित्यनाथ  title=
संग्रहित छायाचित्र

लखनऊ : लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे. मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, या शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या नेतृत्त्वाअंतर्गत राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

एका ट्विटच्या माध्यमातून आदित्यनाथ यांनी शासनाच्या भूमिकेविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीच्या मुद्द्यावरुन योगींनी उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावले. 

'महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम गाणाऱ्या कामगारांचा शिवसेना आणि काँग्रेसच्या सरकारने नुसता छळ मांडला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याशी विश्वासघात करण्यात आला असून, त्यांना आहे त्याच अवस्थेवर (दुर्लक्षित) ठेवण्यात आलं आहे. शिवाय त्यांना स्वगृही जाण्यासही भाग पाडण्यात येत आहे', असं ट्विट करत या आमानवी कृत्यासाठी मानवतेच्या नात्यानेही यासाठी तुम्हाला माफी मिळणार नाही या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली. 

वाचा : रेल्वे मंत्रालयाचे महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

 

दरम्यान, सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या माध्यमातून स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उचलून धरत भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांवर शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आला होता. कोरोनाच्या संकटकाळी भाजप सरकार अपयशी ठरल्याचं म्हणत उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरित मजुरांशी अमानवी व्यवहार केला जात असल्याचा मुद्दा शिवसेनेकडून अधोरेखित करण्यात आला होता. असं करताना योगी आदित्यनाथ यांची तुलना हुकूमशाहा हिटलरशी करण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन आता थेट उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वादाची ठिकणी पडली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.