Cyclone Fengal Viral Video : बंगालच्या उपसागर क्षेत्रामध्ये सक्रीय झालेल्या 'फेंगल' चक्रीवादळानं भारताच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रासह दक्षिणेकडील राज्यांचीसुद्धा चिंता वाढवली. या भागातील हवामान बदलांसमवेत इतर कैक गोष्टींवर वादळाचा परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. या चक्रीवादळाची ताकद नेमकी किती होती, हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथं धावपट्टीवर एक विमान चक्क हवेच्या दाबामुळं कलंडताना दिसत आहे.
उपलब्ध माहितीनुसार IndiGo च्या Airbus A320 हे विमान फेंगल चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलं आणि एका क्षणात या विमानानं जे काही पाहिलं ते शब्दांत मांडणंही कठीण. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. विमान (Chennai) चेन्नई विमानतळावरील धावपट्टीवर लँडींग करत असतानाच वाऱ्याचा प्रचंड झोत आला आणि याच दाबामुळं विमानाची चाकं धावपट्टीपासून अवघ्या काही इंचांवर असतानाच ते हवेतल्या हवेतच कलंडलं आणि वैमानिकानं समयसूचकता दाखवत विमान लँड करण्याऐवजी पुन्हा त्याचं टेकऑफ केलं. विमानाच्या लँडिंगवेळी उदभवलेल्या या संकटादरम्यान वेळीच वैमानिकानं मोठा निर्णय घेतल्यामुळं संकट टळलं.
फेंगल चक्रीवादळाचा पुद्दुचेरी इथं लँडफॉल सुरू असतानाच चेन्नई विमानतळावर हा थरार पाहायला मिळाला. जिथं प्रवाशांनी काळ पाहिला असं म्हणायला हरकत नाही. हवामानात झालेल्या या बदलामुळं चेन्नई विमानतळ प्रशासनानं तातडीनं पुढील सूचना मिळेपर्यंत विमानतळावरील उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेत सावधगिरीचं पाऊल उचललं.
विमानाच्या लँडींगच्या वेळी चेन्नईत घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लाखो युजर्सनी पाहत तो शेअरही केला. सहसा विमान प्रवासादरम्यान अनेकदा हवेच्या बदलत्या दाबामुळं आणि हवेच्या रिक्त खळग्यांमुळं टर्ब्युलन्ससम परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण, इथं मात्र वादळानं वैमानिकालाही संकटात टाकत प्रवाशांना धडकी भरवल्याचच चित्र पाहायला मिळालं.
Challenging conditions at Chennai International airport as cyclone Fengal makes landfall near Puducherry and is likely to cross the Tamil Nadu coasts in the next three to four hours.
The cyclonic storm brought heavy rains in the coastal districts, inundating houses and… pic.twitter.com/1AUohfWfB9
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) November 30, 2024
हा व्हिडीओ व्हायरल होताच इंडिगोच्या वतीनं विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल असून, आपले वैमानिक अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशिक्षित असून अतिशय काटेकोरपणे आणि जबाबदारीनं ते हे काम हाताळतात अशी माहिती देण्यात आली.